बीड : राज्य व केंद्र शासनाचे विविध विभाग आणि जिल्हा उद्योग केंद्राच्या वतीने ‘महानिर्यात इग्नाइट कन्व्हेन्शन-२०२६’ जिल्हास्तरीय कार्यशाळा मंगळवारी पार पडली. यावेळी जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी जिल्ह्यातून साखर आणि कापूस यांसह अन्य उत्पादनांच्या निर्यातीसाठी विशेष प्रयत्न करण्याची गरज आहे, असे मत व्यक्त केले. जिल्ह्यातील सीताफळ उत्पादनावर आधारित प्रक्रिया उद्योग उभारून निर्यातीला चालना द्यावी, असे आवाहन त्यांनी केले. धारूर, केज, वडवणी भागात एक जिल्हा एक उत्पादन’ अंतर्गत सीताफळाचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन होते. यावर प्रक्रिया करणारे उद्योग स्थापन झाल्यास आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत बीडची वेगळी ओळख निर्माण होईल, असे मतही त्यांनी व्यक्त केले.
कार्यशाळेत महाराष्ट्र जिनिंग अॅण्ड प्रेसिंगचे सचिव गोपाळ कासट यांनी जीएसटी आणि उद्योगातील नवीन तंत्रज्ञानावर प्रकाश टाकला.आयडीबीआय कॅपिटलचे विवेक यांनी उद्योगांसाठीच्या वित्तपुरवठा योजनांची माहिती दिली. टपाल विभागामार्फत निर्यातीसाठी दिल्या जाणाऱ्या विशेष सुविधांची माहिती देण्यात आली. प्रियांका यांनी आयात-निर्यात प्रक्रियेतील कायदेशीर बाबी समजावून सांगितल्या. आरशेती एसबीआयचे संचालक मेहरा यांनी बँकिंग क्षेत्राचे महत्त्व विशद केले. सल्लागार जाधव यांनी जिल्ह्याच्या निर्यातीबाबतचा सविस्तर अहवाल सादर केला. जिल्ह्यात निर्यातक्षम वातावरण तयार करण्यासाठी प्रशासन कटिबद्ध आहे. उद्योजकांना येणाऱ्या सोडवण्यासाठी ‘जिल्हा निर्यात समिती’ स्थापन करण्यात आली असून, त्यामार्फत तातडीने उपाययोजना केल्या जातील असे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.

















