बीड : राज्याच्या पशुसंवर्धन, पर्यावरण मंत्री आणि ऊसतोड कामगारांच्या नेत्या पंकजा मुंडे यांच्या पुढाकारामुळे धाराशिव येथील साखर कारखान्याने डोंगरेवाडी येथील ऊसतोड कामगार स्व. गणेश डोंगरे यांच्या अपघाती निधनानंतर या कुटुंबाला २१ लाख रुपयांची आर्थिक मदत केली. याशिवाय, ४ लाख रुपयांची उचलही माफ करण्यात आली आहे. या कुटुंबावर ओढवलेल्या भीषण संकटात मुंडे यांच्या पुढाकाराने मदतीचा हात मिळाला आहे. या संवेदनशील व निर्णायक सहकार्याबद्दल ऊसतोड कामगार संघटनेने पंकजाताई मुंडे यांचे जाहीर आभार मानले. संकटात सापडलेल्या कुटुंबासाठी त्यांनी दाखवलेली तत्परता व माणुसकी ऊसतोड कामगारांसाठी मोठा आधार आहे, अशी भावना व्यक्त केली.
डोंगरेवाडी (सोन्ना खोटा) येथील ऊसतोड मजूर गणेश डोंगरे हे पत्नी व मुलींसह धाराशिव जिल्ह्यातील भाऊसाहेब बिराजदार साखर कारखान्यात ऊस तोडीसाठी गेले होते. कारखाना यार्डमध्ये उसाची ट्रॉली अंगावर पडून त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना समजताच पंकजाताई मुंडे यांनी डोंगरे यांच्या पत्नी व मुलींशी संवाद साधत त्यांना धीर दिला. या कुटुंबाला न्याय व मदत मिळवून देण्यासाठी त्यांनी संबंधित यंत्रणांना निर्देश दिले. स्व. गोपीनाथराव मुंडे ऊसतोड कामगार, मुकादम व वाहतूकदार संघटनेचे पदाधिकारी कृष्णा तिडके, भाजपा युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष संजय आंधळे, सामाजिक कार्यकर्ते माऊली शिरसाट, बाबा मुंडे, सतीश बडे, सुग्रीव तिडके, अमोल तिडके, गोरख दराडे आदींनी पाठपुरावा व आंदोलन केले. या प्रयत्नांना यश येत कारखान्याकडून डोंगरे कुटुंबाला २१ लाख रुपयांचा धनादेश देण्यात आला आणि ४ लाख रुपयांची उचल माफ करण्यात आली.

















