सांगली : बोरगाव येथे बोरगाव- साटपेवाडी व मसुचीवाडी या गावांच्या शिवेवरील आटकुरी परिसरात १०० एकर क्षेत्र क्षारपडमुक्त करून ऊस शेतीला चालना देण्यासाठी पथदर्शी सच्छिद्र पाईप निचरा प्रणाली प्रकल्पाच्या कामाची सुरुवात करण्यात आली. याप्रसंगी राजारामबापू साखर कारखान्याचे अध्यक्ष प्रतीक पाटील यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला. ऊस उत्पादकांना कमी त्रास होईल याची दक्षता घेत क्षारपड जमिनींची सुधारणा करणे, शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत आधुनिक तंत्रज्ञान पोहोचविण्याचा आमचा प्रयत्न आहे. क्षारपड जमिनी पुनरुज्जीवित केल्यास शेती उत्पादन वाढेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
यावेळी कारखान्याचे अध्यक्ष पाटील म्हणाले की, लोकनेते राजारामबापू पाटील, माजी मंत्री जयंत पाटील यांनी शेतीला पाणी दिले आणि तालुक्याचा विकास घडवून आणला. अलिकडच्या काळात एका बाजूला शेतातील उत्पादन खर्च वाढत आहे आणि दुसऱ्या बाजूला पाण्याच्या अतिवापराने जमिनी क्षारपड, नापीक होत आहेत. क्षारपड जमिनी दुरुस्त करणे ही काळाची गरज आहे. त्यासाठी कारखाना प्रयत्नशील आहे. यावेळी राजारामबापू बँकेचे उपाध्यक्ष माणिकराव पाटील, कारखान्याच्या जलसिंचन समितीचे अध्यक्ष प्रदीपकुमार पाटील, संचालक कार्तिक पाटील, दूध संघाचे संचालक धैर्यशील पाटील, अभिजित पाटील, उदय शिंदे, मानाजी पाटील, प्रमोद पाटील, उमेश पाटील, अंजली शृंगारपुरे, जयवंत पाटील, सर्जेराव कदम, कारखान्याचे जलसिंचन अधिकारी जे. बी. पाटील, इरिगेशनचे पारस कोठारी, सुनील वगरे आदी उपस्थित होते.

















