पुणे : ओंकार शुगर ग्रुपचे चेअरमन बाबूराव बोत्रे-पाटील यांनी नुकतीच मंत्री शिवानंद पाटील यांची सदिच्छा भेट घेतली. या भेटीवेळी ऊस उद्योगाची सद्यस्थिती, ऊस उत्पादक शेतकऱ्यांना भेडसावणाऱ्या अडचणी, साखर उद्योगाच्या विकासासाठी आवश्यक धोरणे तसेच भविष्यातील संधी यावर दोघांमध्ये चर्चा झाली. मंत्री शिवानंद पाटील यांनी शेतकरी, सहकारी साखर कारखाने व खासगी साखर उद्योग यांच्यात समन्वय वाढवून ऊस व साखर उद्योग अधिक सक्षम करण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे असे सांगितले. ऊस उत्पादक शेतकरी हा साखर उद्योगाचा कणा आहे. त्यांच्या उत्पादनाला योग्य दर, वेळेवर बिले तसेच आधुनिक तंत्रज्ञानाचा लाभ मिळणे अत्यावश्यक आहे असे मत त्यांनी व्यक्त केले.
वस्त्रोद्योग, ऊसविकास तसेच साखर व कृषी पणन या खात्यांचा कार्यभार सांभाळणारे मंत्री शिवानंद पाटील यांनी सांगितले की, ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे हित जपण्यासाठी कर्नाटक राज्य सरकार कटिबद्ध असून, साखर उद्योगाच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक ते सर्व सहकार्य करण्यात येईल. बाबूराव बोत्रे-पाटील यांनी ओंकार शुगर ग्रुपच्या माध्यमातून ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या हितासाठी राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती दिली. आधुनिक शेती पद्धती, ऊस उत्पादन वाढ आणि शेतकऱ्यांना तांत्रिक मार्गदर्शन देण्यावर भर दिला जात असल्याचेही त्यांनी सांगितले.

















