यवतमाळ : नॅचरल शुगरच्या गुंज सवना युनिटकडून तब्बल ३.४० लाख मेट्रिक टन उसाचे गाळप

यवतमाळ : शेतकऱ्यांच्या हिताला सर्वोच्च प्राधान्य देणाऱ्या नॅचरल शुगरने चालू हंगामात पुन्हा एकदा आपल्या कार्यक्षमतेचा ठसा उमटवला आहे. तालुक्यातील गुंज सवना येथील नॅचरल शुगर अँड अलाइड इंडस्ट्रीज (युनिट-२) मध्ये कारखान्यात सध्या दररोज सरासरी ५,५०० मेट्रिक टन उसाचे गाळप होत आहे. येथे गेल्या ७५ दिवसांत ३ लाख ४० हजार मेट्रिक टन उसाचे विक्रमी गाळप करण्यात आले आहे. विशेष म्हणजे, चालू हंगामासाठी प्रति टन २७०० रुपये असा सर्वाधिक पहिला हप्ता जाहीर करणारा हा विदर्भातील पहिलाच कारखाना ठरला आहे. कारखान्याने आता ‘सीएनजी’ निर्मितीकडेही पाऊल टाकले आहे. पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या तुलनेत विदर्भात ऊस शेतीचे प्रमाण कमी होते. मात्र, नॅचरल शुगरच्या प्रवेशामुळे महागाव, पुसद आणि उमरखेड पट्टयातील चित्र पालटले आहे.

सध्या कारखाना परिसरात प्रतिदिन ६ मेट्रिक टन क्षमतेचा सीएनजी प्रकल्प उभारण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असून, मार्च २०२६ पर्यंत त्याची चाचणी नियोजित आहे. नॅचरल उद्योग समूहाचे प्रमुख कृषिरत्न बी. बी. ठोंबरे (चेअरमन व कार्यकारी संचालक) यांनी या यशाबद्दल सर्व सहकाऱ्यांचे व शेतकऱ्यांचे आभार मानले आहेत. गाळप क्षमतेतील वाढ आणि अचूक नियोजनामुळे महागाव परिसरातील शेतकऱ्यांच्या उसाचे जलद गाळप होत असल्याने सर्वत्र समाधान व्यक्त होत आहे. गेल्या १० वर्षांपासून दर पंधरवड्याला उसाची बिले नियमित अदा करण्याची परंपरा कारखान्याने जपली आहे. याशिवाय कारखान्यातर्फे शेतकऱ्यांसाठी सुधारित ऊस रोपे आणि सवलतीच्या दरात ‘नॅचरल ऑरगॅनिक फर्टिलायझर’ उपलब्ध करून दिली जातात. सीएनजीसाठी लागणारे नेपियर गवत शेजारील गावातील शेतकऱ्यांना मोफत देण्याची योजना कारखान्यातर्फे राबविली जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here