पुणे : ‘बंद पडलेले उद्योग पुन्हा कार्यान्वित होणे ही काळाची गरज आहे. ओंकार शुगर ग्रुपने बंद पडलेला साखर कारखाना सुरू केल्यामुळे शेतकऱ्यांचा ऊस वेळेत गाळप होत असून, त्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. ऊस वेळेत गाळप झाल्यास शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान टळते, असे मत राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी व्यक्त केले. ओंकार शुगर ग्रुपच्या पुण्यातील कार्यालयास सदिच्छा भेट दिली. यावेळी बंद पडलेला साखर कारखाना ओंकार शुगर ग्रुपने पुन्हा सुरू केल्याबद्दल समाधान व्यक्त करत त्यांनी ग्रुपच्या कार्याचे कौतुक केले. याप्रसंगी ओंकार शुगर ग्रुपचे अध्यक्ष बाबूराव बोत्रे-पाटील, ओंकार शुगर ग्रुपचे संचालक ओमराजे बोत्रे-पाटील, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले म्हणाले, आजच्या स्पर्धात्मक काळात शेतकऱ्यांना चांगला बाजारभाव मिळणे अत्यंत महत्त्वाचे आहे. ओंकार शुगर ग्रुप बाजारभावांच्या बाबतीत आघाडीवर असून शेतकऱ्यांना योग्य व समाधानकारक दर दिला जात आहे, ही निश्चितच कौतुकास्पद बाब आहे. तसेच ओंकार शुगर ग्रुपच्या सामाजिक जबाबदारीचा उल्लेख करताना त्यांनी सांगितले, ‘शेतकरी, कामगार आणि स्थानिक परिसराचा विकास साधणारे उद्योगच खऱ्या अर्थान समाजाभिमुख असतात. ओंकार ग्रुपने रोजगारनिर्मितीबरोबरच ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना दिली आहे, असेही ते म्हणाले. यावेळी ओंकार शुगर ग्रुपचे अध्यक्ष बाबूराव बोत्रे-पाटील म्हणाले, शेतकरी हिताला प्राधान्य देत कारखाना चालवण्याचा आमचा संकल्प असून, भविष्यातही शेतकऱ्यांना सर्वोत्तम सुविधा व योग्य दर देण्यासाठी ओंकार शुगर ग्रुप कटिबद्ध राहील.
















