सांगली : शेतकऱ्यांनी एआय तंत्रावर आधारित ऊस शेती करावी यासाठी राजारामबापू सहकारी साखर कारखान्याने पुढाकार घेतला आहे. माजी मंत्री तथा आमदार जयंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या वर्षभरापासून ऊस उत्पादक शेतकऱ्यांशी सखोल चर्चा करण्यात येत आहे. शेतकऱ्यांवर कोणताही अतिरिक्त आर्थिक भार न टाकता कारखान्याच्या कार्यक्षेत्रात १५ हवामान केंद्रे उभारण्यात आली आहेत, अशी माहिती कारखान्याचे अध्यक्ष प्रतीक पाटील यांनी दिली. बोरगाव (ता. वाळवा) येथे प्रगतशील शेतकरी बाबासाहेब सलगर यांच्या शेतात एआय तंत्रज्ञानाअंतर्गत उभारण्यात आलेल्या हवामान केंद्राच्या पाहणी प्रसंगी ते बोलत होते.
राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखाना, बारामती कृषी विज्ञान केंद्र, व्हीएसआय मांजरी (बु.) तसेच संबंधित शेतकरी या प्रकल्पात सहभागी होणार आहेत. प्रत्येक हवामान केंद्राचा लाभ त्या-त्या परिसरातील सुमारे पाच किलोमीटर परिसरातील शेतकऱ्यांना होणार आहे अशी माहिती प्रतिक पाटील यांनी दिली. प्रारंभी लोकनेते राजारामबापू पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी सहाय्यक कृषी संशोधन अधिकारी विवेक पुजारी यांनी शेतकऱ्यांना एआय तंत्रज्ञानाबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. संचालक कार्तिक पाटील, विठ्ठल पाटील, प्रदीपकुमार पाटील, शैलेश पाटील, राजकुमार कांबळे, कृष्णेचे अविनाश खरात, तसेच सचिव डी. एम. पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. अशोक सलगर यांनी स्वागत केले. माजी उपसरपंच राजेंद्र वाटेगावकर यांनी आभार मानले.

















