पुणे: राज्यातील अग्रगण्य साखर कारखान्यांपैकी एक असलेल्या माळेगाव कारखान्याने चालू गाळप हंगामात अवघ्या ७८ दिवसांत ७ लाख ३ हजार मेट्रिक टन उसाचे गाळप केले आहे. सरासरी ११.०२ टक्के साखर उताऱ्याने ७ लाख ६३ हजार साखरपोत्यांचे उत्पादन घेण्यात आले आहे. उपपदार्थ निर्मितीतही कारखान्याने भरीव कामगिरी केली आहे. सहवीजनिर्मिती प्रकल्पाच्या माध्यमातून आतापर्यंत ५ कोटी ४४ लाख ६८ हजार ७०० युनिट वीजनिर्मिती केली असून, ३ कोटी १६ लाख ६३ हजार २०० युनिट विजेची विक्री करण्यात आली आहे, अशी माहिती कार्यकारी संचालक अशोक पाटील यांनी दिली. उपमुख्यमंत्री व कारखान्याचे अध्यक्ष अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली माळेगाव साखर कारखान्याची घोडदौड सुरू आहे.
याबाबत, माळेगाव साखर कारखान्याच्या उपाध्यक्षा संगीता कोकरे यांनी सांगितले की, पुढील काळात गाळप क्षमता वाढविणे, साखर उताऱ्यात आणखी सुधारणा करणे तसेच उपपदार्थनिर्मिती व वीज विक्रीतून कारखान्याच्या उत्पन्नात वाढ करण्यावर विशेष भर दिला जाणार आहे. उच्च साखर उतारा, वेळेत ऊसतोड-वाहतूक, शिस्तबद्ध गाळप प्रक्रिया आणि उपपदार्थ निर्मितीत सातत्याने होणारी वाढ, ही माळेगाव कारखान्याची ओळख ठरत आहे. अध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कारखान्याच्या कामकाजावर विशेष लक्ष केंद्रित केले आहे. या दमदार कामगिरीमुळे परिसरातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले असून, गाळप हंगाम वेळेत पूर्ण होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

















