पुणे : सहकारी साखर कारखान्यांना बळकटी देण्यासाठी अनुदान योजनेतून राज्यातील ३२ सहकारी साखर कारखान्यांना खेळते भांडवल/मार्जिन मनी देण्यात आले. राज्य शासनामार्फत कारखान्यांना ४,३५५ कोटी रुपयांचे कर्ज देण्यात आले होते. या कर्जाच्या वापराचे निरीक्षण करण्यासाठी राष्ट्रीय सहकार विकास निगमच्या (एनसीडीसी) अधिकाऱ्यांनी जून-जुलैमध्ये ३० सहकारी साखर कारखान्यांना क्षेत्रीय भेटी दिल्या. मात्र, २१ सहकारी साखर कारखान्यांनी या कर्जाच्या विनियोगात उल्लंघन केल्याचे राष्ट्रीय सहकार विकास निगमच्या (एनसीडीसी) अधिकाऱ्यांच्या पाहणीत उघड झाले आहे.
या कारखान्यांवर कारवाईची शिफारस करण्यासाठी साखर आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समिती गठित केली आहे. कर्ज दिलेल्या ६ साखर कारखान्यांनी कर्जाच्या अटी शर्तीनुसार कर्ज रकमेचा विनियोग केल्याचे आढळले आहे. सहकारी साखर कारखान्यांकडून कर्जाच्या वापरात गंभीर स्वरूपाचे उल्लंघन आढळले आहेत. सध्या ३ साखर कारखान्यांनी कर्जाच्या वापरात काही प्रमाणात उल्लंघन केल्याचे आढळले आहे. कर्जाच्या विनियोगात गैरवापर केल्याचे आढळून आलेल्या साखर कारखान्यांविरुद्ध करावयाच्या कारवाईची शासनास शिफारस ही समिती करणार आहे. या समितीला अहवाल देण्यासाठी दोन आठवड्यांची मुदत दिली आहे.

















