बीड : राज्यभरात साखर कारखाने सुरू होऊन दोन महिन्यांचा कालावधी उलटला आहे. मात्र, तालुक्याच्या बहुतांश भागात अद्याप ऊस तोडणी सुरू झालेली नाही. वर्षभरानंतरही ऊस शेतातच उभा राहिल्याने अनेक ठिकाणी तुरे येऊ लागले आहेत. सध्या तालुक्यासाठी नवगण राजुरीचा गजानन कारखाना व जय भवानी साखर कारखाना हे दोनच पर्याय उपलब्ध आहेत. मात्र, या कारखान्यांची गाळप क्षमता आणि तालुक्यातील एकूण ऊस क्षेत्र याचा ताळमेळ बसत नाही. त्यातच, कडा सहकारी साखर कारखाना बंद असल्याने परिस्थिती अधिकच बिकट झाली आहे. कडा कारखान्यावर अवलंबून असलेला ऊस आता इतरत्र वळवावा लागत आहे.
शिरुर कासार तालुक्यात स्वतःचा कारखाना नसल्याने येथील शेतकरी पश्चिम महाराष्ट्रातील साखर कारखान्यांवर अवलंबून आहेत. नियमानुसार, कारखान्यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रातील उसाचे गाळप प्रथम करणे अपेक्षित असते. तेथील ऊस संपल्यानंतरच ऊसतोड मजूर मराठवाड्याकडे वळतात. या विलंबामुळे ऊसातील ‘सुक्रोज’चे प्रमाण कमी होऊ लागते. हक्काचा सहकारी साखर कारखाना नसल्याने ऊस उत्पादक शेतकरी सध्या मोठ्या संकटात सापडला आहे. उसाचा उतारा आणि वजन घटण्याची भीती निर्माण झाली असून, वर्षभर घाम गाळून पिकवलेला ऊस डोळ्यांदेखत खराब होताना पाहून शेतकरी पूर्णपणे हतबल झाला आहे. शेतकरी खासगी टोळ्यांना जादा पैसे देऊन तोडणी करून घेण्याच्या मानसिकतेत आहे. ऊस मुदतीच्या आत गाळपासाठी जाणे तांत्रिकदृष्ट्या अत्यावश्यक आहे, असे तालुका कृषी अधिकारी अमृत गांगोर्ड यांनी सांगितले.

















