सांगली : श्रीपती शुगर ॲण्ड पॉवर लि., डफळापूर-कुडनूर कारखान्याच्या सन २०२५-२६ गाळप हंगामातील तीन लाख पंचाहत्तर हजार एकशे अकरा साखर पोती पूजनाचा कार्यक्रम कार्यकारी संचालक महेंद्र लाड व मान्यवरांच्या हस्ते झाला. यावेळी महेंद्र लाड यांनी यावर्षी शेतकऱ्यांच्या ऊस उत्पादक सहकार्याने पाच लाखांचा टप्पा पूर्ण करणार असल्याचे सांगितले. या हंगामातील दि. ३१ डिसेंबरअखेरची सुमारे ८८ कोटी ६४ लाख रुपयांची बिले ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा केली असून ऊस उत्पादकांनी संबंधित बँकेशी संपर्क साधावा. ज्यांची केवायसी अपूर्ण आहे, त्यांनी शेती विभागाशी संपर्क साधून पूर्तता करावी व शेतकऱ्यांनी आपला ऊस श्रीपती शुगरला देऊन सहकार्य करावे, असे आवाहन लाड यांनी केले.
ऊस तोडणी वाहतूकदार यांची तोडणी वाहतूक बिलेही अदा केली आहेत. यावेळी अधिकारी व कामगारांनी वेतनवाढीबद्दल महेंद्र लाड यांचा सत्कार केला. कार्यकारी संचालक महेश जोशी यांनी ऊस उत्पादक शेतकरी, ऊस तोडणी व वाहतूकदार आणि श्रीपती शुगरचे सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने ५ लाख टन ऊस गाळपाचा टप्पा पूर्ण करणार असल्याचे सांगितले. यावेळी शेती अधिकारी सतीश मिरजकर, रणजित जाधव, चिफ इंजिनिअर यशवंत जाधव, चिफ केमिस्ट दीपक वाणी, इलेक्ट्रिकल इंजिनियर आनंदा कदम, ई. डी. पी. मॅनेजर माणिक पाटील, प्रवीण कौलापुरे आदींसह अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
















