पुणे : शिरुर तालुक्यातील गलांडेवस्ती – टाकळी भीमा येथील शेतकरी किसन भुजबळ यांच्या शेतातील उसाच्या फडात बिबट्याचे दोन बछडे आढळले. त्यामुळे ऊस तोडणी कामगारांची धावपळ झाली. वनविभाग, रेस्क्यू टीम व निसर्ग वन्यजीव सामाजिक संस्थेच्यावतीने या शेतातील बिबट्याच्या दोन्ही बछड्यांना ताब्यात घेण्यात आले आहे. बिबट्याच्या बछड्यांना त्यांच्या आईच्या पुनर्मीलनासाठी शेतात सुरक्षित ठिकाणी ठेवले असून परिसरातील शेतकऱ्यांनी शेतात काम करताना काळजी घ्यावी व रात्रीच्या वेळी शेतात फिरू नये, असे आवाहन वनविभागाच्यावतीने करण्यात आले आहे.
उसाच्या शेतात बिबट्याचे बछडे असल्याची माहिती मिळताच वनपरिक्षेत्र अधिकारी निळकंठ गव्हाणे व वनपरिमंडळ अधिकारी गौरी हिंगणे, नियतक्षेत्र वनअधिकारी प्रमोद पाटील, वन्यजीव सामाजिक संस्थेचे शेरखान शेख, गणेश टिळेकर, शुभांगी टिळेकर आदींनी शेतात धाव घेतली. यावेळी शेतकरी किसन भुजबळ, पूनम गवारे, भाऊसाहेब ढोरे, सुखदेव आदक, कानिफ ढोरे उपस्थित होते. बिबट्याचे बछडे ताब्यात घेण्यात आले. स्थानिकांना विशेष काळजी घेण्याविषयी सूचना देण्यात आल्या. दरम्यान, गेल्या महिन्यात बळोबाचीवाडी येथे ऊस तोडणीवेळी बिबट्याचे बछडे आढळले होते. आता पुन्हा दुसऱ्यांदा बछडे आढळल्याने भीतीचे वातावरण आहे.
















