पुणे : पुणे विभागात उसाचे सरासरी क्षेत्र सुमारे ४ लाख ६९ हजार २०३ हेक्टर असून, यंदा आतापर्यंत केवळ २ लाख ९८ हजार ३४१ हेक्टरवर लागवडी पूर्ण झाल्या आहेत. सध्या गळीत हंगाम सुरू असल्याने अनेक शेतकऱ्यांचा ऊस तोडल्यानंतर नवीन लागवडीऐवजी खोडवा ऊस ठेवण्याकडे कल आहे. आतापर्यंत सुमारे ८० हजार २४८ हेक्टर क्षेत्रावर खोडवा ऊस ठेवण्यात आला आहे.
यंदा पुणे जिल्ह्यातील मावळ, मुळशी, भोर, वेल्हा तालुक्यांमध्ये जोरदार पाऊस झाला. तसेच नगर जिल्ह्यातील संगमनेर आणि अकोले तालुक्यांतही समाधानकारक पर्जन्यमान नोंदविले गेले. परिणामी, पुणे जिल्ह्यातील पानशेत, पवना, कळमोडी, चासकमान, नीरा-देवघर ही धरणे शंभर टक्के भरली असून, पुणे व सोलापूर जिल्ह्यांच्या सीमेवरील उजनी धरणही भरले.
ऊस हे शाश्वत उत्पन्न देणारे पीक मानले जात असल्याने शेतकरी दरवर्षी आडसाली, पूर्वहंगामी आणि सुरू अशा तीन हंगामांत ऊस लागवड करतात. साधारणतः १५ जुलै ते १५ ऑगस्टदरम्यान आडसाली, १५ ऑक्टोबर ते ३० नोव्हेंबर दरम्यान पूर्वहंगामी, तर १५ जानेवारी ते १५ फेब्रुवारीदरम्यान सुरू ऊस लागवड केली जाते. नगर जिल्ह्यातील नेवासा, शेवगाव, श्रीरामपूर, श्रीगोंदा, कर्जत, कोपरगाव, संगमनेर आणि राहाता या प्रमुख तालुक्यांत तुलनेने बऱ्यापैकी लागवड झाली आहे.
पुणे जिल्ह्यात शिरूर, दौंड, बारामती, इंदापूर, हवेली, जुन्नर आणि आंबेगाव तालुक्यांत लागवड सुरू आहे. तर सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस, पंढरपूर, मोहोळ, उत्तर सोलापूर, करमाळा, माढा आणि अक्कलकोट तालुक्यांत लागवड झाली असली, तरी संपूर्ण विभागात ऊस लागवडीचे प्रमाण सरासरीपेक्षा कमी असल्याचे चित्र आहे.

















