बीड : ऊसतोड मजुरांच्या टोळ्यांची भासणारी टंचाई आणि वाहनधारकांची होणारी फसवणूक टाळण्यासाठी जिल्ह्यातील साखर कारखानदार व शेतकऱ्यांनी ऊसतोड यंत्रांच्या (हार्वेस्टर) साहाय्याने तोडीला प्राधान्य दिले आहे. त्यामुळे परिसरात यांत्रिक ऊसतोडीचा कल वाढला असल्याचे चित्र दिसत आहे. मात्र, याचा परिणाम जनावरांच्या चाऱ्यावर झाल्याचे दिसून येत आहे. माजलगाव व गेवराई तालुक्यातील पशुपालक शेतकऱ्यांसमोर हा प्रश्न सोडवायचा कसा असा सवाल आहे.
गोदावरी नदी काठावर उसाचे क्षेत्र मोठ्या प्रमाणावर आहे. सध्या या परिसरात गतीने ऊस तोडणी सुरू आहे. नेहमी मजुरांच्या माध्यमातून ऊस तोडणी केली जाते. मजुरंना एक एकर ऊस तोडण्यासाठी सुमारे ३ ते ४ दिवस लागतात. मात्र हार्वेस्टरद्वारे तेच काम ४ ते ५ तासांत पूर्ण होत आहे. यंत्रामुळे उसाचा पालापाचोळा शेतात कुजतो. त्याचा उपयोग खोडवा पिकासाठी सेंद्रिय खत म्हणून होतो. ऊस लवकर तोडला गेल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. मात्र, यंत्रांचा वाढता वापर पशुपालक शेतकऱ्यांच्या दृष्टीने अडचणीचा ठरला आहे. मशीनद्वारे ऊस तोडणीनंतर हिरवा चारा (वाढे) उपलब्ध होत नाही. त्यामुळे जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर बनला आहे.यांत्रिक ऊस तोडणी














