नाशिक : ऊस वाहतुकीदरम्यान होणारे अपघात टाळणे व वाहनचालकांमध्ये वाहतूक नियमांबाबत जनजागृती करण्यासाठी प्रादेशिक परिवहन कार्यालय व कादवा सहकारी साखर कारखान्याच्या संयुक्त विद्यमाने ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनांसाठी रिफ्लेक्टर व सुरक्षा साधने बसविण्यात आली. रस्ता सुरक्षा अभियानाच्या पार्श्वभूमीवर झालेल्या कार्यक्रमाला सहाय्यक प्रादेशिक अधिकारी सचिन बोधले उपस्थित होते. या उपक्रमांतर्गत ऊस वाहतूक करणाऱ्या सर्व वाहनांना रिफ्लेक्टर व आवश्यक सुरक्षा साधने बसविण्यात आली. यावेळी बोधले यांनी यावेळी ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनचालकांना मार्गदर्शन केले. वाहन चालविताना स्वतःसोबतच इतर रस्त्यावरील नागरिकांचाही विचार करावा, वाहतूक नियमांचे काटेकोर पालन करावे असे आवाहन त्यांनी केले.
या कार्यक्रमात ‘कादवा’चे संचालक रामदास पाटील यांनीही वाहनचालकांना मार्गदर्शन केले. ते म्हणाले, की ऊस वाहतुकीदरम्यान नियमांचे उल्लंघन टाळावे, धूम्रपान करून वाहन चालवू नये व सुरक्षित वाहतुकीस प्राधान्य द्यावे, असे सांगितले. कारखान्याचे कार्यकारी संचालक हेमंत माने यांनी प्रास्ताविक केले. कारखाना परिसरात अपघातमुक्त वाहतूक घडवून आणण्यासाठी उपक्रम राबविल्याचे ते म्हणाले. मोटार वाहन निरीक्षक रवींद्र देवरे, सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक महेश बागुल, कारखान्याचे उपाध्यक्ष शिवाजी बस्ते, संचालक विश्वनाथ देशमुख, मधुकर गटकळ, रामदास पिंगळ, कामगार संचालक भगवान जाधव, प्रशासकीय सल्लागार बाळासाहेब उगले, सचिव राहुल उगले, शेतकी अधिकारी मच्छिंद्र शिरसाठ उपस्थित होते. संचालक रावसाहेब पाटील यांनी आभार मानले.

















