कोल्हापूर : दरवर्षी ऊस हंगाम सुरू झाल्यानंतर जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न मिटतो. मात्र, अलीकडील ४-५ वर्षात यंत्राच्या (हार्वेस्टर) साह्याने ऊसतोडी सुरू असल्यामुळे हे चित्र बदलले आहे. ऊस पट्टा असलेल्या शिरोळ तालुक्यातही तशीच स्थिती आहे. ऊस गाळपाचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी कारखाने यंत्राचा वापर करत आहेत तर लवकर ऊस तुटून पुढच्या पिकाची आंतरमशागत करण्यासाठी शेतकरीदेखील यंत्राचा आग्रह करत असल्याने चाऱ्याचा प्रश्न उद्भवू लागला आहे. हिरव्या चाऱ्याचे टंचाई दूध उत्पादनावर हे जाणवत आहे. तालुक्यात पिकणाऱ्या उसाच्या वाड्यासाठी पशुपालकांना शेकड्याला २०० रुपये मोजावे लागत आहेत.
शिरोळ तालुक्यात कोल्हापूर, सांगली जिल्ह्यांसह कर्नाटकातील कारखान्यांसाठी मोठ्या प्रमाणावर ऊस तोडी सुरू असताना चाऱ्याची टंचाई जाणवत आहे. गेल्या काही वर्षांत मशिनने ऊसतोड सुरू आहे. परिणामी जनावरांसाठी चाऱ्यांची टंचाई जाणवत आहे. आधीच ऊसतोड लांबल्यामुळे उसाला तुरे फुटले आहेत. यामुळे उसाच्या वजनात कमालीचे घट होत आहे. सध्या कडाक्याच्या थंडीमुळे गवताची वाढ खुटल्याने चारा टंचाईत भर पडली आहे. सध्या वाडे २०० रुपये शेकडा या दराने पशुपालकांना विकत घ्यावे लागत आहे. सध्या कडाक्याच्या थंडीमुळे गवत, हत्ती गवत यासारख्या चारा पिकांच्या वाढीला पोषक वातावरण नाही. त्यामुळे पशुपालक शेतकरी हवालदिल झाले आहेत.

















