बीड : जिल्ह्यातील ९ साखर कारखान्यांकडे १७० हार्वेस्टर, यंत्राद्वारे ऊस तोडणीचा वेग झाला दुप्पट

बीड : जिल्ह्यात सध्या ऊसतोडणी हंगाम जोरात सुरू आहे. मजुरांच्या तीव्र टंचाईवर मात करण्यासाठी साखर कारखान्यांनी यांत्रिक (हार्वेस्टर) ऊस तोडणीला गती दिली आहे. सध्या जिल्ह्यातील ९ साखर कारखान्यांकडे एकूण १७० हार्वेस्टर उपलब्ध झाल्याने ऊस हंगामात नवे चित्र दिसून येत आहे. यंदा मजुरांची कमतरता, वाढलेले मजुरीचे दर आणि काही ठिकाणी वाहनधारकांकडून होणारी आर्थिक फसवणूक यामुळे शेतकरी आणि साखर कारखानदारांनी हार्वेस्टरला प्राधान्य दिले आहे. सध्या येडेश्वरी ॲग्रो प्रो, पवनसुत नगर कारखान्याकडे सर्वाधिक ४० तर एनएसएल शुगर्स, युनिट नं. ३, पवारवाडी कारखान्याकडे ३७, लोकनेते सुंदररावजी सोळुंके कारखान्याकडे ३५ मशीन आहेत. जयभवानी कारखान्याकडे १५ हार्वेस्टर आहेत. छत्रपती कारखान्याकडे १४, पद्मश्री डॉ. विखे पाटील साखर कारखान्याकडे १६ हार्वेस्टर आहेत.

जिल्ह्यात माजलगाव आणि गेवराई तालुक्यांमध्ये, गोदावरी नदीकाठावर उसाचे क्षेत्र मोठ्या प्रमाणावर आहे. दरवर्षी या भागात ऊस तोडणीसाठी बाहेरून येणाऱ्या मजुरांच्या टोळ्यांवर अवलंबून राहावे लागत होते. मात्र यंदा शेतकरी आणि साखर कारखान्यांनी मोठ्या प्रमाणावर यांत्रिक ऊसतोडणी स्वीकारली आहे. हार्वेस्टरच्या मदतीने एकाच दिवसात, काही तासांत ऊसतोड पूर्ण होत आहे. त्यामुळे ऊस त्वरित कारखान्यापर्यंत पोहोचत असून, वजन घटण्यापूर्वीच ऊस गाळपासाठी जात असल्याने शेतकऱ्यांना थेट आर्थिक फायदा होत आहे. यांत्रिकीकरणामुळे शेतकऱ्यांचे काम सुलभ झाले असले, तरी दुसरीकडे ऊसतोड मजुरांच्या रोजगाराचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. हार्वेस्टरचा वाढता वापर पाहता भविष्यात या मजुरांना रोजगार मिळेल का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here