नवी दिल्ली : भारत सरकारच्या वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाच्या अंतर्गत कार्यरत असलेली कृषी आणि प्रक्रिया केलेले अन्न उत्पादने निर्यात विकास प्राधिकरण (अपेडा), ‘गल्फफूड २०२६’मध्ये एका मजबूत, विस्तारित आणि प्रभावी उपस्थितीसह सहभागी होत आहे. ‘गल्फफूड २०२६’मध्ये भारत भागीदार देश आहे, जे एक विश्वसनीय पुरवठादार देश आणि जागतिक अन्न सुरक्षा व लवचिक पुरवठा साखळीतील प्रमुख योगदानकर्ता म्हणून भारताचे सामरिक महत्त्व अधोरेखित करते. ‘गल्फफूड २०२६’मध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत भारतीय दालनाचा आकार दुप्पट झाला आहे, जो भारतीय कृषी-अन्न निर्यातीचा वाढता आकार, भारतीय उत्पादनांची वाढती जागतिक मागणी आणि निर्यातदार, संस्था व स्टार्टअप्सचा वाढलेला सहभाग दर्शवतो.
भारतातर्फे प्रदर्शनात प्रक्रिया केलेले अन्न, ताजी आणि गोठवलेली उत्पादने, कडधान्ये, धान्ये, पेये, मूल्यवर्धित अन्न उत्पादने आणि कृषी-निर्यात स्टार्टअप्स यासह विविध श्रेणींमधील १६१ प्रदर्शकांचा समावेश आहे. भारतीय दालन निर्यातदार, शेतकरी उत्पादक संस्था (FPOs), सहकारी संस्था, स्टार्टअप्स, राज्य सरकारी संस्था आणि राष्ट्रीय संस्थांना एकत्र आणते. २५ राज्ये आणि प्रदेशांमधील प्रदर्शक सहभागी होत आहेत. यामध्ये आसाम, बिहार, छत्तीसगड, दिल्ली, गुजरात, हरियाणा, हिमाचल प्रदेश, जम्मू आणि काश्मीर, कर्नाटक, केरळ, पश्चिम बंगाल (कोलकाता आणि सिलीगुडीसह), मध्य प्रदेश, महाराष्ट्र (मुंबईसह), मेघालय, पंजाब, राजस्थान, सिक्कीम, तामिळनाडू, तेलंगणा, उत्तर प्रदेश आणि उत्तराखंड यांचा समावेश आहे.














