अहिल्यानगर : सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याच्या उपाध्यक्षपदी ज्ञानेश्वर भगवंता परजणे यांची बिनविरोध निवड झाली. यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून प्रादेशिक उपसंचालक संजय गोंदे, सहायक उमेश कुलकर्णी यांनी काम पाहिले. मावळते उपाध्यक्ष राजेंद्र कोळपे यांचाही यावेळी सत्कार करण्यात आला. संचालक बाळासाहेब वक्ते यांनी प्रास्तविक केले. निवडीनंतर नूतन उपाध्यक्ष परजणे यांचा संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपीनराव कोल्हे, कारखान्याचे अध्यक्ष विवेक कोल्हे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
यावेळी मावळते उपाध्यक्ष राजेंद्र कोळपे म्हणाले की, संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपीनराव कोल्हे, युवा नेते विवेक कोल्हे यांनी देशात सर्वप्रथम उसाच्या रसापासून थेट इथेनॉल निर्मिती, बायो सीएनजी, पोटॅश खत निर्मातीतुन या कारखान्याची वेगळी ओळख बनविली आहे. उपाध्यक्षपदावर काम करण्याची संधी त्यांच्यामुळेच मिळाली.माजी मंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांनी साखर कारखानदारीत सातत्याने नविन तंत्रज्ञानाचा ध्यास घेत कारखान्याचा नावलौकीक वाढविला होता, असे ते म्हणाले. माजी उपाध्यक्ष अरूणराव येवले, शिवाजीराव वक्ते, शरदराव थोरात, केशवराव भवर, नानासाहेब गव्हाणे, मच्छिंद्र केकाण, संचालक सर्वश्री. विश्वासराव महाले, बापूसाहेब बारहाते, निलेश देवकर, ज्ञानदेव औताडे आदी उपस्थित होते. माजी संचालक फकिरराव बोरनारे यांनी आभार मानले.

















