सोलापूर : ऊस तोडणी टोळ्यांकडून फसवणूक, वाहतूकदार ३० जानेवारीपासून करणार अन्नत्याग आंदोलन

सोलापूर : दरवर्षी गळीत हंगामात ऊस तोडणी मजुरांशी वाहतूकदार करार करतात. मात्र, तोडणी मजुरांच्या टोळ्यांकडून त्यांची फसवणूक करण्याची घटना घडते. सोलापूर जिल्ह्यातील ऊस वाहतूक वाहनधारकांची मुकादमांकडून मोठी आर्थिक फसवणूक केल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. याबाबत तक्रारी खूप वाढल्या आहेत. काही कारखान्यांवर दरवर्षी प्रत्येकी सुमारे ५० हून अधिक शेतकऱ्यांची फसवणूक होत आहे. या पीडित शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी सोलापूर जिल्हा सावकारग्रस्त शेतकरी समितीचे अध्यक्ष कांतिलाल नाईकनवरे हे शुक्रवारपासून (ता. ३०) जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अन्नत्याग आंदोलन करणार आहेत. यावेळी समितीचे राज्याचे अध्यक्ष व सावकारी कायद्याचे अभ्यासक अरुण इंगळे हे मार्गदर्शन करणार आहेत.

याबाबत पटवर्धन कुरोली येथील पीडित शेतकरी सुशांत गिरी गोसावी यांनी आपला अनुभव सांगितला. ते म्हणाले की, मला तीन वर्षांपासून वेगवेगळ्या मुकादमाने फसवले आहे. माझी दोन एकर शेत जमीन कारखान्याच्या वसुलीसाठी विकावी लागली. मी मजुरी करून उदरनिर्वाह करतो आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माझ्यासह राज्यातील वाहनमालकांना इच्छा मरणाची परवानगी द्यावी किंवा वसुलीसाठी कायदा करावा. तर खेडभळवणीचे शेतकरी बाबासाहेब करपे यांनी माझीही मुकादमाकडून फसवणूक झालेली आहे. मी अनेक वर्षे प्रयत्न करतो आहे. तरीदेखील अद्याप पर्यंत संबंधित मुकादमावर ४२० चा गुन्हा दाखल झाला नाही असे सांगितले. सावकारी कायद्याचे अभ्यासक अरुण इंगळे यांनी वाहनधारक शेतकरी कर्जबाजारी बनत आहेत. या शेतकऱ्यांची फसवणूक थांबण्यासाठी योग्य कायदा करण्याची गरज आहे, असे मत व्यक्त केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here