पुणे : उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा आज सकाळी बारामती विमानतळाजवळ झालेल्या विमान अपघातात मृत्यू झाला. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या प्रचार सभेला उपस्थित राहण्यासाठी अजित पवार मुंबईहून बारामतीला जात होते. बारामती विमानतळावर उतरताना विमान कोसळून जवळच्या शेतात कोसळले. या अपघातात अजित पवारांसह एकूण सहा जणांचा मृत्यू झाला. अजित पवार यांच्या मृत्यूमुळे राज्याच्या सहकार चळवळीची प्रचंड मोठी हानी झाली आहे. विशेषतः राज्याची साखर कारखानदारी अजित पवार यांच्यासारख्या दूरदर्शी ‘दादा’ माणसाच्या नेतृत्वाला कायमची मुकली आहे.
यशवंतराव चव्हाण, वसंतदादा पाटील, शरद पवार यांच्याप्रमाणे राज्याच्या सहकार आणि साखर उद्योगाची चांगली समज असणारा नेता म्हणून अजित पवार यांना ओळखले जायचे. अजित पवार यांनी राजकारणात सक्रीय झाल्यानंतर महाराष्ट्रातील साखर कारखानदारीला नवी दिशा देण्याचे काम केले. अजित पवार यांनी १९८४ नंतर प्रथमच २०२५ मध्ये माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत विजयी होत पुन्हा एकदा कारखान्यावर निर्विवाद सत्ता मिळवली. पुणे, सोलापूर, धाराशिव अशा विविध जिल्ह्यात अनेक सहकारी आणि खासगी साखर कारखाने अजित पवार किंवा त्यांच्या नातेवाईक अथवा समर्थकांच्या नियंत्रणाखाली आहेत.
‘शुगरटुडे’मध्ये प्रसिद्ध झालेल्या एका लेखानुसार, अजित पवार हे माळेगाव सहकारी साखर कारखाना, जरंडेश्वर सहकारी साखर कारखाना, सोमेश्वर सहकारी साखर कारखाना, छत्रपती सहकारी साखर कारखाना, दौंड शुगर, अंबालिका शुगर आदी कारखान्यांशी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष जोडले गेले होते. याशिवाय अजित पवार समूहाशी संबंधित/समर्थीत एकूण १०-१२ कारखान्यांचा अप्रत्यक्ष प्रभाव असल्याचे सांगितले जाते. लेखात पुढे म्हटले आहे कि, अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील साखर कारखान्यांनी व सहकार चळवळीने महाराष्ट्रातील ग्रामीण अर्थव्यवस्थेत मोठे योगदान दिले आहे. त्यांनी कृषीमध्ये शाश्वत वाढ, नव्या तंत्रज्ञानाचा वापर, आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेचा विकास साधण्यासाठी प्रभावी उपाययोजना केल्या. एआय (Artificial Intelligence) वापर, जलयुक्त शिवार, ‘वन तालुका वन मार्केट’, नदीजोड प्रकल्प, बाम्बू लागवड, सिंचन प्रकल्प, आणि ग्रिड-प्रणालीद्वारे ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना पाणीपुरवठा यासारखे उपक्रम सुरू केले आहेत. ‘व्हीएसआय’च्या माध्यमातूनही ते राज्यातील साखर उद्योगाच्या विकासात महत्वाची भूमिका बजावत होते.
अजित पवार यांची पार्श्वभूमी…
अजित पवार यांची आई देवळाली प्रवरा येथील कदम घराण्यातील होत्या, तर ज्येष्ठ नेते शरद पवारांचे मोठे भाऊ असलेले, अजित पवार यांचे वडील अनंतराव पवार हे व्ही. शांताराम यांच्या राजकमल स्टूडिओमध्ये नोकरीला होते. अजित पवार यांचे आजोबा गोविंदराव पवार हे बारामती सहकारी खरेदी विक्री संघामध्ये नोकरीला होते तर आजी शारदाबाई या काटेवाडीतील शेती सांभाळात असत. अजित पवारांचे शालेय शिक्षण देवळाली प्रवरा येथे झाले. त्यानंतर ते मुंबईत त्यांचे काका शरद पवार यांच्याकडे दहावीनंतरच्या शिक्षणासाठी आले. महाविद्यालयीन शिक्षण पुर्ण करून दादा पुन्हा बारामतीत परतले. येथे सहकारी संस्थांच्या माध्यमातून सामाजिक कार्याला सुरवात केली. १९९१ ला त्यांची पुणे मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्षपदी नियुक्ती झाली आणि त्याचवर्षी ते विधानसभा निवडणुकीत निवडूनही आले.
या विजयानंतर त्यांनी कृषी, फलोत्पादन आणि उर्जा राज्यमंत्री पदाचा कार्यभार सांभाळला. त्यांनी एकदा बारामती लोकसभा मतदारसंघाचे खासदार म्हणून प्रतिनिधित्व केले. २०१४ पर्यंत राज्यात विविध खात्याच्या मंत्रीपदाचा कार्यभार सांभाळला. पाच वेळा बारामतीचे आमदार म्हणून विजयी झालेल्या अजित पवार यांनी बारामतीचा प्रचंड विकास केला. अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस या मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली उपमुख्यमंत्री म्हणून काम करत असताना अजित पवारांनी आपल्या कामाचा ठसा उमटविला. अजित पवार यांनी तब्बल 6 वेळा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून जबाबदारी संभाळली आणि तो देखील राज्याच्या राजकारणातील एक मोठा विक्रम आहे.

















