सोलापूर : शेतकऱ्यांच्या अतिरिक्त उसाचा प्रश्न जकराया कारखान्याने सोडवल्याने समाधान – अध्यक्ष सचिन जाधव

सोलापूर : जकरायाच्या उभारणीच्या अगोदर शेतकऱ्यांना आपला ऊस तोडून बांधावर टाकावा लागत होता. ही वस्तुस्थिती आहे. मोहोळ तालुक्यात निर्माण झालेल्या अतिरिक्त उसाचा प्रश्न जकराया शुगरमुळे सुटला आहे. ऊस गाळपासाठी वेळेत आणणे आणि त्याचे बिल वेळेत देणे ही परंपरा जकराया शुगरने कायम जपली, असे प्रतिपादन कुरूल जिल्हा परिषद गटाचे उमेदवार तथा जकराया शुगरचे अध्यक्ष सचिन जाधव यांनी केले. वटवटे येथे प्रचार दौऱ्यावेळी ते बोलत होते. शेतकऱ्यांचे एखादे काम माझ्याकडून होण्यास एखाद्या वेळेस उशीर झाला असेल, मात्र मी काम टाळले आहे. असे कधी झाले नाही. जकराया शुगरचा कार्यकारी संचालक म्हणून काम करताना माझ्याकडे मदतीसाठी आलेला एकही माणूस रिकाम्या हाताने कधी माघारी गेला नाही, असेही ते म्हणाले.

सचिन जाधव म्हणाले, या उद्योग समूहाने नावीन्याचा ध्यास घेत विविध उपपदार्थ निर्माण करून जकराया महाराजांच्या नावाचा झेंडा अटकेपार फडकविला आहे. कोणतीही राजकीय आणि उद्योगाची पार्श्वभूमी नसणाऱ्या ॲड. बी. बी. जाधव यांच्या आव्हानाला प्रतिसाद देऊन तब्बल १७,००० सभासदांनी जकराया शुगरच्या उभारणीसाठी शेअर्स विकत घेतले. त्या काळात ॲड. जाधव यांनी ग्रामदैवत असणाऱ्या जकराया महाराजांचे नाव कारखान्याला दिले. हा उद्योग समुह आज भरारी घेत आहे. या वेळी अंजनगाव येथील श्री खिलोबा देवस्थान व श्री क्षेत्र पट्टणकोडोली (कोल्हापूर) येथील प्रमुख मानकरी नानादेव फरांडे यांचे दर्शन त्यांनी घेतले. मोहोळ नगरपंचायतचे स्वीकृत नगरसेवक सुशील क्षीरसागर, बाळासाहेब नाईकनवरे, मंगेश पांढरे, बाळासाहेब वाघमोडे, मुजीब मुजावर आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here