पटना : ऊस आयुक्त अनिल कुमार झा यांनी राजगीरमध्ये कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांशी भेट घेतली. यावेळी ऊस आयुक्तांनी अधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीत क्लस्टर निर्मितीला हिरवा कंदील दाखवला. त्यामुळे आता नालंदामधील ऊस लागवडीला एक नवीन दिशा मिळेल. नुरसराईमधील ‘जमुनानगर मॉडेल’च्या अनुषंगाने जिल्ह्यात पाच नवीन ऊस क्लस्टर स्थापन केले जातील, असे यावेळी ठरले. या बैठकीत शेतकऱ्यांनी आपल्या समस्या मांडल्या. यावेळी शेतकऱ्यांना वैज्ञानिक शेतीबाबत मार्गदर्शन करण्यात आले. जुन्या पद्धती सोडून शेतीत आधुनिक वाण आणि यंत्रसामग्री वापरण्यावर भर देण्यात आला. शेतकऱ्यांना तांत्रिकदृष्ट्या सक्षम करणे, त्यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी प्रयत्न करणे हेच आमचे उद्दिष्ट आहे, असे आयुक्त झा यांनी सांगितले.
राजगीरमध्ये झालेल्या शेतकरी संवादादरम्यान, आयुक्त अनिल कुमार झा यांनी जिल्हा कृषी अधिकारी डॉ. नितेश कुमार यांना क्लस्टर लवकरात लवकर स्थापन करण्याचे निर्देश दिले. कार्यक्रमात मोठ्या संख्येने ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी सहभाग घेतला. ऊस विभागाचे सहसंचालक महेंद्र प्रताप सिंह यांनी तांत्रिक सत्रात संवाद साधताना शेतकऱ्यांना वैज्ञानिक पद्धतींचा अवलंब करण्याचा सल्ला दिला. त्यांनी सुधारित जातींची निवड आणि कीटक व्यवस्थापनाचे बारकावे स्पष्ट केले. उपस्थित शेतकऱ्यांनी या उपक्रमाचे कौतुक केले आणि भविष्यातही असे प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्याची मागणी केली. जिल्हा कृषी अधिकारी डॉ. नितेश कुमार यांनी सरकारी योजनांची माहिती दिली आणि त्यांचा जास्तीत जास्त लाभ घेण्याचे आवाहन केले.















