कोल्हापूर : दौलत-अथर्व इंटरट्रेड शेतकरी सहकारी साखर कारखान्याने सन २०१०-११ या गळीत हंगामातील शेतकऱ्यांची थकीत एफआरपी अखेर अदा केली आहे. या कालावधीत मृत्यू झालेल्या शेतकऱ्यंच्या वारसांना हे थकीत दोन कोटी रुपयांचे वितरण करण्यात आल्याची माहिती कारखाना प्रशासनाच्यावतीने देण्यात आली. संबंधीत ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या वारसांनी तहसीलदार व कारखाना प्रशासनाकडे याबाबत निवेदन दिले होते. त्यांनी अद्याप ही थकीत एफआरपीची रक्कम न मिळाल्याबाबत लक्ष वेधले होते. अथर्व दौलत प्रशासनाने मृतांच्या कायदेशीर वारसांना ऊस बिले अदा करण्यासाठी सुरुवातीपासून तयारी दर्शवली होती.
तहसीलदार कार्यालयात आयोजित बैठकीमध्ये मृत ऊस पुरवठादर शेतकऱ्यांच्या बिलाबाबत प्रश्न उपस्थित करण्यात आला होता. त्यानंतर अथर्व-दौलत कारखान्याचे अध्यक्ष मानसिंग खोराटे यांनी व्यवस्थापनाकडून याची माहिती घेतली. कारखाना प्रशासनाने वारसांची पडताळणी करून त्यानंतर एफआरपी देण्याची प्रक्रिया पूर्ण केली. संबंधित वारसांची थकीत एफआरपीची रक्कम अदा केल्याचे अथर्व-दौलत कारखान्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी विजय मराठे यांनी सांगितले. अथर्व प्रशासनाने वेळोवेळी विहीत सभासदांना जास्तीत जास्त लाभ मिळवून दिले आहेत. कामगारांचीही देणी देण्यासाठी प्रशासन सदैव प्रयत्नशील राहिले आहे, असे मराठे यांनी सांगितले.
















