कोल्हापूर : आंदोलन अंकुश संघटनेच्यावतीने लोकवर्गणीतून उसाची रिकव्हरी काढणारी प्रयोगशाळा उभारण्यात येणार आहे. यातून साखर कारखानदारांकडून साखरेच्या उताऱ्यामध्ये बदल करून केली जाणारी लूट उघड होईल, असा विश्वास आंदोलन अंकुश संघटनेचे प्रमुख धनाजी चुडमुंगे यांनी व्यक्त केला. शिरोळ-नृसिंहवाडी मार्गावरील शेतकरी वजन काट्यावर ही लोकवर्गणीतून उसाची रिकव्हरी तपासणारी प्रयोगशाळा उभारण्यात येणार आहे. प्रजासत्ताक दिनी, सोमवारी यासाठी निधी संकलनास सुरुवात करण्यात आली. पहिल्याच दिवशी ६० हजाराहून अधिक निधी जमा झाला.
याबाबत माहिती देताना ‘आंदोलन अंकुश’चे प्रमुख धनाजी चुडमुंगे म्हणाले की, आंदोलन अंकुश संघटनेने काटामारी करणाऱ्या कारखान्यांना रोखण्यासाठी लोकवर्गणीतून शेतकऱ्यांच्या मालकीचा वजन काटा उभारण्यात आला आहे. त्यातून या भागातील काटामारी रोखण्यात यश आले आहे. आता आम्ही रिकव्हरीकडे लक्ष दिले आहे. शेतकऱ्यांच्या उसाचा दर कारखान्यांच्या रिकव्हरीवर ठरतो. पण कारखाने रिकव्हरी कमी दाखवतात. त्यामुळे उसाचा दर कमी मिळतो अशी शेतकऱ्यांची भावना आहे. खरे तर राज्य सरकारने रिकव्हरी तपासणारी त्रयस्थ व्यवस्था निर्माण करणे गरजेचे होते. मात्र, साखर कारखानदार सरकारमध्ये असल्याने ते झालेले नाही. आम्ही आता प्रयोगशाळेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना अचूक माहिती देऊ. जिल्हा प्रमुख दिपक पाटील यांनी तालुक्यातील प्रत्येक गावातून दानशूर व्यक्ती आणि शेतकऱ्याकडून निधी गोळा करून येत्या हंगामापर्यंत प्रयोगशाळा सुरु करण्याचा संकल्प आहे असे सांगितले. तालुक्यातील शेतकऱ्यांनी निधी संकलनास सहकार्य करण्याचे आवाहन तालुकाध्यक्ष नागेश काळे यांनी केले.

















