कोल्हापूर : शिरोळ तालुक्यातील दानोळी येथील प्रगतिशील शेतकरी अजितकुमार अण्णा पाराज यांनी आपल्या दीड एकर शेतीत १९५ टन असे उसाचे विक्रमी उत्पादन घेतले आहे. वर्षभरात बियाणे, खते, मशागत यासाठी १ लाख रुपये खर्च करून त्यांनी ऊस पिक घेतले. यात आंतरपीक म्हणून बीट लागवड केली होती. बीट आणि उसाचे मिळून १० लाखांचे उत्पन्न घेतले. तोडणीवेळी ४८ ते ५० कांड्या ऊस उत्पादनामुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये याबद्दल कुतूहल निर्माण झाले आहे. पाराज यांनी केलेली ऊस लागवड आणि नियोजन याबद्दल माहिती घेण्यासाठी अनेक शेतकरी भेटी देत आहेत.
पाराज यांनी बीट आंतरपीक करून त्याचेही ३ लाख रुपये उत्पन्न मिळवले. यापूर्वी या परिसरातील काही शेतकऱ्यांनी विक्रमी ऊस उत्पादन करून ११० टनापर्यंत उत्पादन घेतले आहे; पण अलीकडे आधुनिक तंत्रज्ञान, योग्य खत व्यवस्थापन आणि शास्त्रोक्त नियोजन करून त्याहीपेक्षा विक्रमी उत्पादन घेतले आहे. जून २०२५ मध्ये त्यांनी ऊस लागवड केली होती. एक महिन्याने बेसल डोस दिला. ३ वेळा औषध फवारणी केली. शेताची प्रत आणि आवश्यकतेनुसार ३ वेळा रासायनिक खते टाकली. सिंचन पद्धती आणि महिन्यातून एक पाटपाणी दिले. त्यांना कृषी मार्गदर्शक प्रशांत चंदोबा यांचे मार्गदर्शन मिळाल्याचे त्यांनी सांगितले. त्यांना आंतरपीक असलेल्या बीटचे ३ लाख रुपये उत्पन्न मिळाले. तर १९५ टन उसापासून ७ लाख रुपये उत्पन्न मिळाले. खर्च वजा जाता निव्वळ नफा ९ लाख रुपये मिळाला.

















