सांगली : रायगाव (ता. कडेगाव) येथील रायगाव शुगर अँड पॉवर लिमिटेडमध्ये ( सहयोग ओंकार साखर कारखाना युनिट १६) साखर पोत्यांचे पूजन करण्यात आले. बंद पडलेल्या या कारखान्यात ओंकार ग्रुपचे अध्यक्ष बाबुराव बोत्रे- पाटील यांच्या हस्ते साखर पूजन पार पडले. यावेळी माजी आमदार पृथ्वीराज देशमुख यांनी ऊस उत्पादक शेतकरी हा साखर उद्योगाचा खरा कणा असून, योग्य वजन, पारदर्शक कारभार आणि बिलांची निश्चिती हाच खरा विकास आहे, असे सांगितले.
पृथ्वीराज देशमुख म्हणाले की, अनेक वर्षे बंद अवस्थेत असलेले कारखाने ओंकार ग्रुपने पुन्हा सुरू केल्यामुळे राज्यातील लाखो शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. यामुळे आर्थिक विकासाला नवी दिशा मिळेल, असा विश्वास वाटतो. यावेळी बाबूराव बोत्रे-पाटील यांनी भविष्यात सहवीज आणि इथेनॉल प्रकल्प उभारण्याचा संकल्प असल्याचे सांगितले. ते म्हणाले की, शेतकरी सुखी तर कारखाना समृद्ध या तत्त्वावर आमचा कारभार सुरू आहे. या कार्यक्रमाला कारखान्याचे अधिकारी, कर्मचारी आणि मोठ्या संख्येने उपस्थित होते.

















