नंदुरबार : खानदेशात यंदा ऊस गाळप २४ लाख टनांवर जाईल, असा अंदाज आहे. यंदा ऊस गाळप हंगाम रडतखडत सुरू आहे. आतापर्यंत ११ लाख टन ऊस गाळप पूर्ण झाले आहे. ऊस गाळपात नंदुरबारने आघाडी घेतली आहे. खानदेशात नाशिक, छत्रपती संभाजीनगर व अहिल्यानगर या जिल्ह्यांतील कारखानेदेखील ऊस तोडणी करीत आहेत. धुळ्यातील साक्री, जळगावमधील चाळीसगाव, चोपडा भागांत अन्य जिल्ह्यांतील कारखान्यांमध्येही ऊस तोडणी गतीने सुरू आहे.
खानदेशात बहुसंख्य कारखान्यांचे व्यवस्थापन खासगी असून, ऊस गाळप अतिशय संथ गतीने सुरू आहे. नंदुरबारमध्ये तीन साखर कारखाने सुरू आहेत. धुळ्यात एक लहान कारखाना सुरू असून, तेथे रोज ६०० ते ७०० टन उसाचे गाळप केले जात आहे. जळगाव जिल्ह्यातही एकच कारखाना सुरू आहे. नंदुरबारमधील समशेरपूर (ता. नंदुरबार) येथील खासगी कारखान्याने अधिकचे ऊस गाळप केले आहे. डोकारे (ता. नवापूर) व तळोदा येथे श्रीकृष्ण कारखान्यानेही बऱ्यापैकी ऊस गाळप केले आहे. तर जळगाव जिल्ह्यात चहार्डी (ता. चोपडा) येथील कारखान्याने देखील गाळप बऱ्यापैकी केले आहे. धुळ्यातील साक्री, नंदुरबार जिल्ह्यातील तळोदा, शहादा या भागात अन्य भागांतील कारखाने ऊस खरेदी, तोडणी करीत आहेत.

















