सांगली : सांगली जिल्ह्यातील गाळप हंगाम सुरू होऊन तीन महिन्याचा कालावधी पूर्ण झाला आहे. गाळप हंगाम आता अंतिम टप्प्यात आला आहे. जिल्ह्यात प्रत्येक साखर कारखान्यांकडे सुमारे १० ते १५ ऊस तोडणी यंत्रे आहेत. त्यामुळे ऊस गाळप गतीने होत आहे. जिल्ह्यातील १५ साखर कारखान्यांनी ६७,९४,५२१ टन उसाचे गाळप केले आहे. आतापर्यंत एकूण ७०,५५,२९४ क्विंटल साखरेचे उत्पादन झाले आहे. जिल्ह्याचा सरासरी साखर उतारा १०.३८ टक्के आहे. सध्या आडसाली लावणीची तोडणी संपून खोडवा ऊस तोडण्यास सुरुवात झाली आहे. आतापर्यंत २५ टक्के खोडवा हंगामाच्या सुरुवातीलाच तुटला आहे त्यामुळे उर्वरित खोडवा फेब्रुवारी अखेर तुटेल आणि हंगाम संपेल असा अंदाज आहे.
जिल्ह्यातील सोनहीरा वांगी साखर कारखान्याने ऊस गाळपात आघाडी घेतली आहे. राजारामबापू कारखान्याच्या वाटेगाव शाखेने सर्वाधिक साखर उतारा आहे. नागेवाडी (ता. खानापूर) येथील ‘यशवंत शुगर’ने सर्वांत कमी गाळप आणि कमी साखरेचे उत्पादन केले आहे. तर दत्त इंडिया कारखान्याने सर्वाधिक साखर उत्पादन घेतले आहे. गाळप गतीने सुरू असले तरी यंदा सर्वच कारखान्याच्या तोडणी मजुरांनी तोडणी यंत्रणा ‘हायजॅक’ केल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. तोडणी मजूर शेतकऱ्यांकडे पैशांची मागणी करत आहे. अडचणीत सापडलेला शेतकरी तोडणी मजुरांच्या आमिषाला बळी पडत आहेत. यावर कोणत्याच कारखान्याचे नियंत्रण नसल्याचे दिसून येत आहे.
















