सांगली : सध्या ऊस तोडणी हंगाम जोमात सुरू आहे. रस्त्यावर ऊस वाहतूक करणाऱ्या विनारिफ्लेक्टर ट्रॅक्टर्सची वर्दळ वाढली आहे. गेल्या पंधरा दिवसात अशा बेदरकार वाहतुकीमुळे दोघांचा हकनाक बळी गेला आहे. बुधवारी (दि. २८) रात्री रेठरेधरणजवळील अपघातात शिराळा येथील अभिषेक अमर परदेशी (वय २४) हा तरुण ठार झाला. जखमी पवन कदम (वय २२) याचाही काल मृत्यू झाला. पंधरा दिवसांपूर्वी अंत्री येथील तरुणाचाही अपघाती होऊन मृत्यू झाला होता. १२ डिसेंबरला गोरखनाथ मंदिराजवळ ट्रॅक्टर आणि एसटी बस अपघात झाला होता. सुदैवाने जीवित हानी झाली नव्हती. अशा वाढत्या अपघातांना जबाबदार कोण? हा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरच्या अपघातांच्या संख्येत प्रचंड वाढ झाली आहे. मात्र यातून होत असलेल्या धोकादायक वाहतुकीमुळे निष्पाप नागरिक बळी जात आहेत. चुकीच्या पद्धतीने सुरू असलेली ऊस वाहतूक रस्त्यावरून धावणाऱ्या अन्य वाहनचालकांच्या जिवावर उठली आहे. दरवर्षी गाळप हंगाम सुरू झाल्यावर अपघाताच्या घटनांमध्ये वाढ होते. ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर चालकांवर कोणाचाच वचक नसल्याचे दिसून येते. ऊस वाहतूक करताना पुरेशी खबरदारी घेण्यात येत नाही. त्यामुळे वारंवार दुर्घटना घडताना दिसतात. वाहनचालकांमध्ये वाहतूक नियमांबाबत जनजागृती केली जात नाही. ट्रॅक्टरच्या दोन ट्रॉलींची क्षमता १४ ते १५ टन वाहतुकीची असते. परंतु यामध्ये १८ ते २० टन ऊस भरला जातो. त्यातून अपघात घडून अनेकांचे बळी गेल्याच्या घटनाही घडल्या आहेत. संबंधित विभागाने तातडीने दखल घेऊन कडक कारवाई करण्याची गरज आहे.

















