सोलापूर : ज्यांनी स्वतःची एक संस्था उभारली नाही, ते लोक आज बाहेरून येऊन जकराया साखर कारखान्यावर खोटेनाटे आरोप करून संभ्रम निर्माण करत आहेत. कारखाना बंद पाडण्याची भाषा वापरणाऱ्यांनी हवे तर दहा काटे उभारावेत, असे आव्हान भाजपचे जिल्हा परिषद उमेदवार सचिन जाधव यांनी दिले. कुरुल येथे जाधव व कुरुल पंचायत समितीचे उमेदवार बिरुदेव मोटे यांच्या प्रचारार्थ कुरुल येथे आयोजित प्रचार दौऱ्यात ते बोलत होते. जकराया साखर कारखान्यामुळे मोहोळ तालुक्यातील अतिरिक्त उसाचा प्रश्न सुटला आहे. आम्ही संस्था उभारून लोकांचे प्रपंच उभारले आहेत. मात्र विरोधकांनी कारखाना बंद करण्याची भाषा करू नये, असे ते म्हणाले. अध्यक्षस्थानी माजी सभापती जालिंदर लांडे होते.
यावेळी जालिंदर लांडे म्हणाले की, कुरुल जिल्हा परिषद गटात घरोघरी जाऊन केंद्र आणि राज्य सरकारच्या शेतकरी, गोरगरीब आणि सर्वसामान्यांसाठी राबवलेल्या योजनांची माहिती द्या. दरम्यान, कुरुल येथे रविवारी गावातून पदयात्रा निघाली. विठ्ठल-राम मंदिरातील पदयात्रेत समारोप झाला. यावेळी भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष प्रकाश चवरे, पंडित निकम, नगरसेवक सुशील क्षीरसागर, प्रा. एन. बी. पवार, सोमेश क्षीरसागर, अशोक जाधव, शत्रुघ्न जाधव, बाबासाहेब जाधव, भाऊसाहेब पाटील, सरपंच शशिकांत माने, वैभव गुंड पाटील, प्रा. माउली जाधव, प्रमोद जाधव, सुरेश जाधव, बाळासाहेब जाधव, रमेश जाधव, उमेदवार बिरुदेव मोटे आदी उपस्थित होते.

















