देशातील साखर उत्पादन वाढले, महाराष्ट्राच्या साखर विक्री कोट्यातही फेब्रुवारीत ९ टक्क्यांची वाढ

नवी दिल्ली : देशातील साखर उत्पादनात गेल्यावर्षीच्या तुलनेत १८ टक्क्यांनी वाढ झाली आहे. या वर्षी जानेवारीअखेर १९५.०३ लाख टन साखर उत्पादित झाली. गेल्यावर्षी जानेवारी महिन्यात हेच प्रमाण १६४.७९ लाख टन इतके होते. आजघडीला देशभरात ५१५ साखर कारखाने सुरू आहेत अशी माहिती ‘इस्मा’ने दिली आहे. दरम्यान, केंद्र सरकारने देशातील साखर कारखान्यांना फेब्रुवारीसाठी २२.५ लाख टन कोटा जाहीर केला आहे. त्यात महाराष्ट्राला सर्वाधिक ९ लाख ३५ हजार ८९८ टन कोटा मंजूर झाला आहे. जानेवारीच्या तुलनेत साखर कोट्यात पन्नास हजार टनांची वाढ करण्यात आली आहे.

दैनिक ‘अॅग्रोवन’मध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, सद्यस्थितीत देशात साखर उत्पादनात सर्वाधिक वाटा महाराष्ट्राचा असून त्या खालोखाल उत्तर प्रदेश आणि कर्नाटकचा क्रमांक लागतो. साखर उद्योगातील जाणकारांच्या मते, १७ फेब्रुवारीपासून रमजान महिना सुरू होत आहे. त्यामुळे साखरेच्या वापरात लक्षणीय वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे किरकोळ, घाऊक बाजारात मागणी मजबूत राहील. साखरेच्या दरांनाही आधार मिळण्याची शक्यता वर्तविली जात आहे. या कालावधीत महाराष्ट्रातील अनेक साखर कारखान्यांचा गाळप हंगाम समाप्त होत असल्याने बाजारातील अतिरिक्त साखर पुरवठा कमी होईल. दरम्यान, सर्व कारखान्यांनी साखरेसंदर्भातील माहिती ‘एनएसडब्ल्यूएस पोर्टल’शी (राष्ट्रीय एक खिडकी प्रणाली) १० फेब्रुवारीपर्यंत जोडण्यासही बजावण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here