पुणे : जिल्ह्यात आजपर्यंत सर्व साखर कारखान्यांनी एकूण १ कोटी ९ लाख ४१ हजार ८१६ मेट्रिक टन गाळप केले आहे. सहकारी व खासगी साखर कारखान्यांमध्ये सुरू असलेल्या चुरशीच्या स्पर्धेत बारामती ॲग्रो लिमिटेड-पिंपळी या कारखान्याने गाळपात निर्विवाद वर्चस्व सिद्ध करीत जिल्ह्यात अव्वलस्थान पटकावले आहे. बारामती ॲग्रोने आत्तापर्यंत १६ लाख ६८ हजार ३०९ मेट्रिक टन गाळप करून इतर सर्व कारखान्यांना मागे टाकले आहे. मोठी गाळपक्षमता, सातत्यपूर्ण ऊसपुरवठा, वेळेवर पेमेंट आणि आधुनिक यांत्रिकीकरण, याचा या कामगिरीला मोठा हातभार लाभल्याचे चित्र आहे.
गाळपाबाबतीत दौंड शुगर, श्री अंबालिका शुगर्स आणि भीमाशंकर यांसारख्या कारखान्यांनीही लक्षणीय कामगिरी केली आहे. गाळपाबरोबरच साखर उताऱ्याबाबत सहकारी साखर कारखान्यांनी खासगी कारखान्यांवर मात केली आहे. यामध्ये सोमेश्वर सहकारी साखर कारखाना सध्याच्या १२.५४ टक्के उताऱ्यासह पहिल्या क्रमांकावर, तर माळेगाव सहकारी साखर कारखाना १२.४८ टक्के दुसऱ्या क्रमांकावर आहे. एमआरएन भीमा (मधुकरनगर), बारामती ॲग्रो आणि भीमाशंकर या कारखान्यांनीही १० टक्क्यांपेक्षा अधिक उतारा राखत समाधानकारक कामगिरी केली आहे. जिल्ह्यात एकूण १८ साखर कारखान्यांपैकी कर्मयोगी साखर कारखाना, राजगड साखर कारखाना, घोडगंगा साखर कारखाना हे तीन साखर कारखाने या हंगामात बंद होते.

















