नांदेड : श्री सुभाष, शिऊर कारखान्यातर्फे दररोज १० हजार टन ऊस गाळप – चेअरमन देशमुख

नांदेड : शिऊर साखर कारखाना लिमिटेड वाकोडी आणि श्री सुभाष शुगर प्रायव्हेट लिमिटेड हडसणी या दोन्ही कारखान्यांनी ऊस दर वेळेत दिला आहे. शेतकऱ्यांसाठी सुलभ सेवा आणि कर्मचारी वर्गाचे सहकार्य यामुळे कारखान्याची कार्यक्षमता वाढली आहे. दोन्ही कारखान्यांचे मिळून प्रति दिवस १० हजार मेट्रिक टन गाळप सुरू आहे. या कारखान्याने ऊसतोड वाहतूक व वजन प्रक्रियेत पारदर्शकता राखत शेतकऱ्यांचा विश्वास जिंकला आहे अशी माहिती कारखान्याचे चेअरमन सुभाषराव देशमुख आणि कार्यकारी संचालक सुशीलकुमार देशमुख यांनी दिली. एक ते १५ फेब्रुवारीदरम्यान जाहीर केलेला अंतिम ऊस दर २,७५१ रुपये असून, प्रोत्साहनपर रक्कम २५ रुपये देत प्रोत्साहनपर अंतिम ऊस दर २,७७६ रुपये देण्यात येणार आहे. १६ फेब्रुवारी ते १५ मार्च या पंधरवड्यात प्रोत्साहनपर १०० रुपये देऊन प्रोत्साहनपर अंतिम ऊस दर २,८५१ रुपये देण्यात येणार आहे, तर १६ मार्च ते पुढे प्रोत्साहनपर २०० रुपये देऊन अंतिम ऊस दर २,९५१ रुपये दिला जाणार आहे.

चेअरमन देशमुख म्हणाले की, कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील कळमनुरी, हदगाव, हिमायतनगर, उमरखेड व गेट केन विभागातील शेतकऱ्यांनी नजीकच्या कारखान्याच्या भूलथापांना बळी न पडता आपला ऊस इतर कारखान्यास देऊ नये. दोन्ही कारखान्यांनी पर्यावरणपूरक उपक्रम राबवत वीजनिर्मिती, पाणी पुनर्वापर आणि आधुनिक यंत्रसामग्रीचा वापर केला आहे. शेतकरी, कर्मचारी व व्यवस्थापन यांच्या एकत्रित प्रयत्नांमुळे श्री सुभाष शुगर कारखाना हडसणी हा परिसरातील आदर्श औद्योगिक उपक्रम ठरत असून, भविष्यात आणखी प्रगती साधेल. जास्तीत जास्त ऊस उत्पादकांनी कारखान्याच्या प्रोत्साहन अनुदान योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन कारखान्याचे मुख्य शेतकी अधिकारी किशोर वानखेडे व जनरल मॅनेजर मधुकर पतंगे यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here