धुळे : शिरपूर शेतकरी सहकारी साखर कारखाना माँ-रेवा शुगर्स प्रा.लि. (मध्य प्रदेश) यांना भाडेतत्वावर देण्यात आला आहे. २०२६-२७ हंगामात हंगामात साखर कारखाना सुरु होणार असून यासाठी माजी मंत्री आमदार अमरिशभाई पटेल यांनी पाठपुरावा केला. हा कारखाना २० वर्षे कालावधीसाठी भाडेतत्वावर देण्यासाठी मे. माँ-रेवा शुगर्स प्रा.लि. यांना शिरपूर सहकारी साखर कारखाना संचालक मंडळ व जिल्हा बँक पदाधिकारी यांनी ताब्यात दिला होता. रजिस्ट्रेशन होण्यासाठी अनेक तांत्रिक अडचणी येत होत्या.
तांत्रिक अडचणी दूर होऊन ३० जानेवारी रोजी अधिकृतरित्या शासन दरबारी रजिस्ट्रेशन झाले. त्यामुळे आता २०२६-२७ च्या गळीत हंगामात साखर कारखाना सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाल आहे. पुढील हंगामात कारखाना सुरु होण्याबाबत माँ रेवा कंपनचे जनरल मॅनेजर गणेश यादव यांनी माहिती दिली. माँ रेवा कंपनीचे डायरेक्टर अंकित गोयल यांनी शिरपूरचा हा ८ वा साखर कारखाना भाडेतत्वावर चालवायला घेतला असून यापूर्वी ७ साखर कारखाने त्यांनी यशस्वीरित्या चालविले आहेत.
गेल्या काही वर्षापासून शिरपूर तालुक्यातील ऊस याच अनुभवी उद्योजकांकडे दुर्गा खांडसरी व ठिकरी मध्यप्रदेश येथील साखर कारखान्यांमध्ये शेतकरी पाठवत होते. शिरपूर शेतकरी साखर कारखाना हा पुढील वर्षाच्या हंगामात सुरु होणार असल्याने शिरपूर तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.
















