राष्ट्रीय साखर महासंघाने हार्वेस्टरद्वारे ऊस तोडणीमुळे उत्पादन घटत असल्याचा आक्षेप फेटाळला

नवी दिल्ली : ऊस तोडण्याची प्रक्रिया ही केवळ पक्व झालेला ऊस असल्याने हाताने किंवा यंत्राने कापणी केल्यामुळे जैविक उत्पादनात फरक पडत नाही. ‘हार्वेस्टर’मुळे उत्पादन घटत नसून त्याचा संबंध प्रत्यक्षात कापणीदरम्यान होणाऱ्या हानीशी आहे. विविध विद्यापीठे आणि महाराष्ट्रातील साखर कारखान्यांनी केलेल्या अभ्यासानुसार योग्य नियोजन आणि व्यवस्थापन असल्यास हार्वेस्टरद्वारे कापणी करताना होणारी हानी केवळ दोन ते पाच टक्क्यांपर्यंत मर्यादित राहते, जी हाताने कापणीइतकीच आहे. त्यामुळे हार्वेस्टर यंत्राद्वारे ऊस कापणी केल्याने प्रति एकर सुमारे १५ टन उत्पादन घट होते, हा तर्क दिशाभूल करणारा आहे. त्याला कोणताही वैज्ञानिक किंवा वस्तुनिष्ठ आधार नसल्याचे राष्ट्रीय साखर महासंघाने म्हटले आहे. यांत्रिक कापणी ही श्रम व वेळ वाचवणारी, शाश्वत शेतीसाठी उपयुक्त असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले.

याबाबत ‘नॅशनल फेडरेशन ऑफ कोऑपरेटिव्ह शुगर फॅक्टरीज लिमिटेड’ने म्हटले आहे की, ब्राझील व ऑस्ट्रेलिया यांसारख्या देशांमध्ये ९५ ते १०० टक्के ऊस कापणी यांत्रिक पद्धतीने होते. तरीही तेथे ऊस उत्पादन आणि साखर उतारा भारतापेक्षा जास्त आहे. हार्वेस्टर हे आयसीएआर, राज्य कृषी तंत्रज्ञानाच्या कार्यक्षमतेचे ठोस उदाहरण आहे. शेतीमध्ये तंत्रज्ञानाचा वाढता वापर अपरिहार्य आहे. काही माध्यमांतील अपप्रचारामुळे शेतकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण होऊ शकतो. साखर उद्योगासाठी हे घातक ठरू शकते. त्यामुळे शेतकरी व नागरिकांनी अशा विषयांवर वैज्ञानिक आणि प्रमाणित माहितीच्या आधारेच निष्कर्ष काढावेत. उसाचे उत्पादन हे कापणीच्या पद्धतीवर नव्हे तर उसाची जात, शेती पद्धती, मातीची सुपीकता, सिंचन व्यवस्था आणि हवामान या घटकांवर अवलंबून असते, असे महासंघाने नमूद केले आहे. शेतजमीन समतल नसणे, शिफारशीनुसार ओळीतील अंतर न राखणे, ऊस आडवा पडलेला असणे, बेस कटरची चुकीची उंची, अपुरी ओलावा स्थिती आणि प्रशिक्षित चालकाचा अभाव या कारणांचा विचार शेतकऱ्यांनी करावा असे साखर महासंघाने म्हटले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here