नाशिक : निफाडच्या दक्षिण भागाला गोदावरी नदीचा प्रचंड मोठा किनारा लाभल्याने या भागातील हजारो हेक्टर क्षेत्र ओलिताखाली असून बागायती आहे. या भागात उसासह अनेक पिकांची पारंपरिक शेती केली जाते. दरवर्षी जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी होते. गेल्यावर्षी जिल्ह्यात अति मुसळधार पावसामुळे गोदावरी नदीला तीन ते चार वेळेस पूरपरिस्थिती निर्माण झाली होती. त्यामुळे निफाड तालुक्यातील गोदाकाठ भागातील शेतजमिनीसह पिके पाण्याखाली राहिल्याने उसाचे ५,००० हेक्टर क्षेत्र बाधित झाले. हा ऊस तोडण्यास कारखाने तयार नसल्याने शेतकरी मेटाकुटीस आले आहेत. परिसरातील व बाहेरील अनेक कारखान्यांचे कामगार असतानासुद्धा आर्थिक ‘देवाण-घेवाण’ करूनच ऊस तोडण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली.
दरवर्षी या भागातील सायखेडा, चांदोरी, शिंगवे, गोंदेगाव, करंजगाव, कोठुरे, चापडगाव, मांजरगाव, कुरडगाव व सुंदरपूर आदी गावांना पुराचा फटका बसतो. पुराचे पाणी शेतात आल्याने ऊस, सोयाबीन, मका पिकांचे मोठे नुकसान होत असते. गेल्यावर्षी अतिवृष्टीमुळे ऊस पिकाचे भरपूर नुकसान झाले. उत्पन्नात घट झाली. दरवर्षी गोदावरीला पूरपरिस्थिती निर्माण होते. यात मोठे नुकसान होते. याबाबत कोठुरेचे शेतकरी विष्णू मोगल यांनी सांगितले की, गेल्यावर्षी मे ते ऑक्टोबरपर्यंतच्या सलग पावसाने उसाच्या मुळ्यांची वाढ खुंटली. कारखाना ऊस तोडणीला तयार नसल्याने शेतकरी अडचणीत आला आहे.

















