सांगली : मिरज भागात स्थानिक कारखान्यांची यंत्रणा तोकडी, उसाला तुरे आल्याने शेतकरी धास्तावले

सांगली : मिरज तालुक्यातील कवलापूर कांचनपूर, रसुलवाडी, सांबरवाडी आरग, बेडग या परिसरात यंदा ऊस लागवड मोठ्या प्रमाणात आहे. मात्र, यंदा गेल्या दोन महिन्यांपासून उसाला तुरे आले असल्याने वजनात घट होण्याची भीती आहे. सद्यस्थितीत स्थानिक साखर कारखान्यांची तोडणी व उचल यंत्रणा तोकडी आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना आपला ऊस कर्नाटकातील कारखान्यांकडे कमी दराने पाठविण्याची वेळ आली आहे. ऊस वेळेवर न उचलल्यास साखर उतारा व उत्पादनावर परिणाम होण्याची भीती शेतकऱ्यांना सतावत आहे. स्थानिक साखर कारखान्यांकडून ऊस वेळेवर उचलला जात नसल्याने शेतकरी अडचणीत आहे.

सांगली जिल्ह्यापेक्षा सीमाभागातील कारखान्यांचे दर कमी असूनही शेतकरी आर्थिक फटका सहन करत ऊस घालवण्यास प्राधान्य देत आहेत. तुरे आलेल्या उसाच्या वजनात घट येण्यामुळे शेतकरी चिंतेत आहेत.कारखान्यांकडून उचल संथ गतीने सुरू असल्याने शेतकऱ्यांसमोर ऊस तातडीने गाळपास नेण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे कर्नाटकच्या पश्चिम भागातील काही साखर कारखान्यांनी या परिसरात सक्रियपणे ऊस नोंदणी व उचल सुरू केली आहे. वेळीच ऊस न उचलल्यास वजनात घट, साखर उतारा कमी होणे व उत्पादन खर्च वाढण्याची भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे स्थानिक साखर कारखान्यांनी तातडीने ऊस उचल वाढवावी, अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here