हिंगोली : वसमत विभागात ७.८६ लाख मे. टन उसाचे गाळप; पूर्णा कारखाना आघाडीवर

हिंगोली : वसमत विभागात गेल्या तीन महिन्यांत विभागातील तिन्ही कारखान्यांनी आपापल्या क्षमतेनुसार गाळप प्रक्रियेत सक्रिय सहभाग घेतला आहे. दोन सहकारी आणि एका खासगी कारखान्याने मिळून एकूण ७ लाख ८६ हजार मेट्रिक टन उसाचे गाळप केले आहे. यावर्षी गाळप प्रक्रिया नियोजित वेळेनुसार सुरू असल्याने फेब्रुवारी अखेरपर्यंत कार्यक्षेत्रातील संपूर्ण ऊस गाळपाला जाईल. उन्हाची तीव्रता वाढण्यापूर्वी ऊस तुटणार असल्याने शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे.

कारखाना प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, तोडणी आणि वाहतुकीचे नियोजन चोख असल्यामुळे गाळपाचा वेग समाधानकारक आहे. पूर्णा सहकारी साखर कारखान्याने गेल्या ८७ दिवसांत ३ लाख ४८ हजार मे. टन उसाचे गाळप केले. तर कोपेश्वर साखर कारखान्याने ८६ दिवसांत ३ लाख १३ हजार मे. टन उसाचे गाळप केले आहे. टोकाई सहकारी साखर कारखान्याने ७५ दिवसांत १ लाख २३ हजार मे. टन गाळप केले. अशा प्रकारे विभागात एकूण ७ लाख ८६ हजार मेट्रिक टन उसाचे आतापर्यंत गाळप झाले आहे. शेतात उभा असलेला ऊस वेगाने कारखान्यांकडे वळत असून फेब्रुवारीअखेरपर्यंत सर्व उसाचे गाळप पूर्ण होईल, असा विश्वास कारखाना प्रशासनाकडून व्यक्त करण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here