बेळगाव : बेळगाव जिल्हा ऊस उत्पादनासाठी प्रसिद्ध असून, हजारो शेतकरी ऊस शेतीवर अवलंबून आहेत. मात्र, गेल्या काही महिन्यांपासून जिल्हा आणि परिसरात उसाच्या पिकाला लागणाऱ्या आगीच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. अचानक लागणाऱ्या आगीमुळे शेकडो एकरांवरील ऊस जळून खाक होत असल्याने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होत आहे. सध्या अस्तित्वात असलेल्या पीक विमा योजनांमध्ये आग लागण्यामुळे होणाऱ्या नुकसानीचा समावेश नसल्यामुळे शेतकरी अधिकच अडचणीत सापडले आहेत. ऊस उत्पादक शेतकऱ्यांना विमा कवच देण्याची शेतकऱ्यांची मागणी वाढू लागली आहे.
ऊस हे दीर्घ कालावधीचे व खर्चिक पीक असल्याने आग लागल्यास नुकसान भरून काढणे शेतकऱ्यांना अशक्य होते. बेळगाव जिल्ह्यातील शेतकरी संघटना, सहकारी साखर कारखाने, कृषी तज्ज्ञांनी ऊस पिकाला स्वतंत्र विमा कवच देण्याची जोरदार मागणी केली आहे. पिकांना अवकाळी पाऊस, दुष्काळ किंवा पूर यासाठी विमा संरक्षण मिळते. मात्र, आगीसारख्या नैसर्गिक व मानवनिर्मित आपत्तींना यात घेतले जात नसल्याने ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. आग, विजेचा धक्का, वीज वाहिन्यांचे शॉर्टसर्किट यांसारख्या कारणांमुळे होणाऱ्या नुकसानीसाठी विशेष विमा योजना राबवावी, अशी मागणी करण्यात आली आहे. राज्य व केंद्र सरकारने या गंभीर प्रश्नांची दखल घेऊन उसासारख्या महत्त्वाच्या नगदी पिकासाठी सर्वसमावेशक विमा योजना लागू करावी, अशी अपेक्षा शेतकरी वर्गातून व्यक्त होत आहे.

















