सांगली : ऊसतोड मजुरांच्या दोन गटांत वादावादीतून मारहाणीची घटना बेडग (ता. मिरज) येथे घडली. या प्रकरणी दोन्ही गटांकडून परस्परविरोधी फिर्यादी दाखल करण्यात आल्या आहेत. त्यानुसार, पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुकादमाला काय सांगितले अशी विचारणा करत संशयितांनी मारहाण केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. भांडणात फिर्यादीच्या गळ्यातील मंगळसूत्र, कर्णफुले कुठेतरी पडून ते गहाळ झाल्याचेही म्हटले आहे. त्यानुसार दोन्ही गटाच्या संशयितांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिरज ग्रामीण पोलिस ठाण्यात दाखल फिर्यादीनुसार, शनिवारी (ता. ३१) सकाळी दहाच्या सुमारास ही घटना घडली. अनिता पिंटू जाधव (मालकांडा, जि. विजापूर) यांनी रेश्मा दादू राठोड, राहुल चव्हाण ( बेडग ) यांच्याविरोधात फिर्याद दिली. फिर्यादी जाधव हे भाऊसाहेब बुरसे यांच्या शेतात ऊसतोड करत असताना संशयित रेश्मा व तिचा भाऊ राहुल तिथे आले. ‘आमच्याबद्दल मुकादमाला तू काय सांगितले’ अशी विचारणा करत शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. रेश्मा दादू राठोड यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, सोमू जाधव, विकास जाधव आणि विनोद यांनी रेश्मा आणि अनिता यांच्यात झालेल्या वादावादीनंतर ऊस टोळीचा मुकादम सोमू जाधव, त्याचा मुलगा विकास जाधव व अन्य एकाने फिर्यादीचा भाऊ राहुल, आई सखूबाई, वहिनी रेश्मा यांना काठीने मारहाण करून जखमी केले.














