सातारा : ओगलेवाडी येथील हजारी माळ नावाच्या शिवारात आपल्या शेतातील पाचट पेटवताना शेजाऱ्याच्या उसाला आग लागली. ही आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न करणाऱ्या शेतकऱ्याचा होरपळून मृत्यू झाला. जयवंत दिनकर डुबल (वय ६५, रा. मळा वॉर्ड, हजारमाची) असे मृत्यू झालेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. काल, सायंकाळी ही दुर्दैवी घटना घडली. या घटनेची माहिती मिळताच परिसरातील शेतकऱ्यांनी तेथे धाव घेतली. त्यांनी बचाव करेपर्यंत डुबल यांचा होरपळून मृत्यू झाला होता.
जयवंत डुबल यांच्या शेतातील उसाची काही दिवसांपूर्वी तोडणी झाली होती. त्यांनी काल दुपारी शेतात जाऊन पाचट पेटवले. मात्र,वाऱ्यामुळे आगीची झळ शेजारच्या उसाला लागून तो ऊस पेटू लागला. त्यामुळे डुबल यांनी उसाला लागलेली आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न सुरू केला. यांदरम्यान ते पाय अडखळून खाली कोसळले. वाळलेले पाचट व त्यांच्या कपड्यांनी पेट घेतला. त्यामुळे जयवंत हे गंभीररीत्या भाजले. परिसरातील शेतकऱ्यांनी मदतीचा प्रयत्न केला. मात्र, त्याचा उपयोग झाला नाही. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवून दिला आहे.
















