पुणे : दिवंगत अजितदादा पवार यांच्यामुळे सन १९९२ च्या सत्तांतरापासून आजपर्यंत सोमेश्वर साखर कारखान्याचा कायापालट झाला आहे. कारखान्याचा उपपदार्थनिर्मिती प्रकल्प, शिक्षण संस्था राज्यात उत्कृष्ट आहेत. कारखान्याने अडीच हजार टनांपासून १०,००० टनापर्यंतचा टप्पा गाठला. सोमेश्वर कारखान्याने काटकसरीतून राज्यात सर्वोच्च दर देण्याची प्रथाच पाडली याने शेतकऱ्याची सर्वंकष प्रगती झाली. त्यांच्या कामांची पिढ्यानपिढ्या आठवण राहावी यासाठी पुतळा उभारत आहोत अशी घोषणा कारखान्याचे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप यांनी दिली.
जगताप म्हणाले की, कृतज्ञता म्हणून अजितदादांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्याचा संचालक मंडळाचा मानस आहे. अजितदादांनी देशाचे नेते शरद पवार यांच्या मदतीने ‘सोमेश्वर’ला उद्योगसमूह बनवले. चार ठिकाणी नवी विद्यालये सुसज्ज इमारतीसह सुरू केली. इंजिनिअरिंग, डिप्लोमा, बीएस्सी- एमएस्सी, एमबीए, बीसीएस असे शिक्षणसंकुल उभारले. शिक्षण संस्थेस पवार चॅरिटेबल ट्रस्टने कोट्यवधींची मदत केली. अजितदादांनी सोमेश्वरनगर परिसरात भव्य क्रीडा संकुलासाठी सव्वा कोटी शासननिधी दिलाय. ते अधिक भव्य व्हावे, यासाठी त्यांनी प्लॅन बदलायला लावून स्वतः सीएसआरमधून एक कोटींची तजवीज काही दिवसांपूर्वीच केली. त्याचेही नामकरण ‘लोकनेते अजितदादा पवार क्रीडा संकुल’ असे केले जाईल.
















