कोल्हापूर : अमेरिका आणि भारत या दोन देशांतील व्यापार कराराचा भारतीय साखर उद्योगाला फारसा फटका बसणार नाही.भारत हा साखर उत्पादनात जगात दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्यामुळे अमेरिकेतून भारतात साखर आयात होण्याची शक्यता जवळपास नाही, असे उद्योगातील जाणकारांचे म्हणणे आहे. परंतु या करारामुळे अमेरिकेतील इथेनॉल भारतात आले तर मात्र साखर उद्योगाची आर्थिक कोंडी होणार आहे. भारताने इथेनॉल आयातीला परवानगी देणार नसल्याचे सांगीतले आहे. मात्र प्रत्यक्ष करारात तरतुदी काय आहेत, याविषयी स्पष्टता नसल्यामुळे इथेनॉल आयात होणार की नाही याविषयी अद्याप स्पष्टता नाही.
अमेरिकेत शुगर बीट हा साखर निर्मितीसाठी मुख्य स्रोत आहे. एकूण साखर उत्पादनापैकी सुमारे ६० टक्के साखर बीटापासून तयार होते. अमेरिका रिपब्लिक, ब्राझील, ग्वाटेमाला आणि कोलंबिया या जवळच्या देशांकडून साखर आयात करते. भारतात केंद्र सरकारने साखर निर्यातीबाबत धोरणे कडक ठेवून मर्यादित कोटा निश्चित केला आहे. अमेरिकेकडून भारतीय साखरेला मोठ्या प्रमाणात मागणी निर्माण होण्याची शक्यता नाही. भारताकडून अमेरिकेला जाणारी साखर अत्यल्प प्रमाणात आहे. त्यामुळे अमेरिकेशी झालेल्या व्यापार करारामुळे इतर पिकांप्रमाणे सध्याच्या स्थितीत तरी साखर उद्योगावर विशेष परिणाम होण्याची शक्यता नसल्याचे तज्ज्ञांनी स्पष्ट केले.

















