लातूर : किल्लारी (ता. औसा) येथील निळकंठेश्वर सहकारी साखर कारखान्याने २२ नोव्हेंबर ते ३१ डिसेंबर अखेर गाळप केलेल्या उसाला प्रती टन २७०० रुपयांचा पहिला हप्ता अदा केला आहे. यंदाच्या गळीत हंगामात आतापर्यंत या कारखान्यातून सुमारे दोन लाख टन उसाचे गाळप पूर्ण झाले आहे. अनेक वर्षांपासून बंद असलेला निळकंठेश्वर सहकारी साखर कारखाना आमदार अभिमन्यू पवार यांच्या पुढाकाराने पुन्हा सुरू झाला असून, कारखाना सुरू करण्यासाठी त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला. कारखान्याचा अंतिम दर जिल्ह्यातील इतर कारखान्यांएवढाच देणार असल्याचे प्रशासकीय मंडळाचे अध्यक्ष, आमदार अभिमन्यू पवार यांनी सांगितले.
कारखान्याने पहिल्या टप्प्यात एकूण २४ कोटी ३५ लाख रुपये ऊसबिले शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर सोमवारी वर्ग केली आहेत. कारखान्याचे पूर्ण नूतनीकरण व क्षमतावाढही करण्यात आली आहे. कारखाना पुनरुज्जीवनामुळे किल्लारी व परिसरातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना अन्य कारखान्याची मनमानी सहन करण्याची गरज उरलेली नाही. अनेक आर्थिक अडथळे, यांत्रिक अडचणी तसेच प्रशासकीय अडसरांवर मात करत अखेर हा कारखाना कार्यान्वित करण्यात यश आले आहे. परिसरातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना हक्काचा सहकारी साखर कारखाना उपलब्ध झाला असून, ऊस गाळप व बिल देयकाबाबत निर्माण होणाऱ्या अडचणी दूर झाल्या आहेत.


















