सातारा : जिल्ह्यातील साखर हंगाम अंतिम टप्प्यात आला आहे. यंदाच्या गळीत हंगामात सहभागी झालेल्या १७ साखर कारखान्यांनी ९९.०९ लाख मेट्रिक टन ऊस गाळप केला आहे. आतापर्यंत ९५.७३ लाख क्विंटल साखरेचे उत्पादन घेतले आहे. जिल्ह्याचा सरासरी साखर उतारा ९.६६ टक्के इतका आहे. लवकरच ऊस गाळप एक कोटी टनाचा टप्पा गाठेल अशी शक्यता आहे. जिल्ह्यात सर्वच कारखान्यांनी ३२०० ते ३५०० रुपये दरम्यान दर दिला जात आहे. मात्र काही कारखान्यांकडून पंधरवड्याची ऊस बिले देण्याचा प्रोग्रॅम विस्कळीत झाला आहे. यामुळे शेतकऱ्यांना ऊस बिलांची वाट पहावी लागत आहे.
जिल्ह्यातील नऊ सहकारी साखर कारखान्यांनी ४८.४४ लाख मेट्रिक टन उसाचे गाळप करून ११.१६ टक्के या सरासरी उताऱ्यासह ४३.४० लाख क्विंटल साखरेचे उत्पादन केले आहे. कराड तालुक्यातील ‘यशवंतराव मोहिते कृष्णा’ कारखान्याने सर्वाधिक १४.७५ लाख मेट्रिक टन उसाचे गाळप केले. सरासरी ११.७८ टक्के उतारा मिळवला आहे. सह्याद्री सहकारी कारखान्याने ७.४४ लाख मेट्रिक टन गाळप पूर्ण केले आहे. जिल्ह्यातील आठ खाजगी कारखान्यांनी ४७.२८ लाख मेट्रिक टन उसाचे गाळप केले आहे. या कारखान्यांचा सरासरी साखर उतारा ८.४९ टक्के आहे. खाजगी कारखान्यांमध्ये जरंडेश्वर शुगर मिल्सने १३.५४ लाख मेट्रिक टन सर्वाधिक गाळप केले आहे. सातारा तालुक्यातील अजिंक्यतारा सहकारी साखर कारखान्याने सर्वाधिक १२.३४ टक्के साखर उतारा मिळवला आहे.

















