महाराष्ट्र : ओंकार शुगर ग्रुपचे ५० लाख टन उसाचे गाळप पूर्ण : हजारो ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यावर एक हजार २७० कोटी रुपये जमा

पुणे : ओंकार शुगर ग्रुपने शेतकरी हिताला केंद्रस्थानी ठेवत चालू हंगामात एकूण ५० लाख मेट्रीक टन उसाचे गाळप यशस्वीरीत्या पूर्ण केले. ओंकार शुगर ग्रुपच्या महाराष्ट्रातील विविध भागातील १७ साखर कारखान्यांमार्फत हे गाळप झाले. या गाळपासाठी शेतकऱ्यांनी पुरवठा केलेल्या उसापोटी ग्रुपने एकूण १ हजार २७० कोटी रुपयांचे ऊस बिल वेळेत शेतकऱ्यांच्या खात्यावर अदा केले आहे. यामुळे राज्यातील हजारो ऊस उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. इतर कारखान्यांच्या तुलनेत सर्वोच्च ऊस दर, काट्यावर योग्य वजन आणि वेळेवर ऊस विल ही ओंकार शुगर ग्रुपची ओळख असून ही परंपरा याही हंगामात कृतीतून सिद्ध झाली, असे ओंकार शुगर ग्रुपचे अध्यक्ष बाबुराव बोत्रे- पाटील यांनी सांगितले

अध्यक्ष बाबुराव बोत्रे- पाटील म्हणाले की, शेतकरी जगला पाहिजे, शेतकऱ्याच्या घामाला योग्य दाम मिळालाच पाहिजे. कुठेही वजन करा आणि ऊस घेऊन या काटा योग्यच राहील, शेतकऱ्याला सर्वोच्च दर दिला जाईल आणि ऊस बिल वेळेत मिळेल.” आज २०२५-२६ च्या गळीत हंगामात ओंकार शुगर ग्रुपने ही भूमिका केवळ शब्दांत नव्हे तर कृतीतून करून दाखवली आहे. ओंकार शुगर ग्रुपच्या विविध युनिट्समध्ये आधुनिक यंत्रसामग्री, पारदर्शक व्यवस्थापन आणि नियोजनबद्ध गाळपामुळे शेतकऱ्यांचा ऊस वेळेत गाळपाला गेला. यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागला नाही. तसेच, त्यांचे उत्पन्न सुरक्षित राहिले. शेतकऱ्यांचा ऊस हा आमची जबाबदारी आहे या भावनेतून ओंकार ग्रुपने कामकाज केले आहे.

ओंकार शुगर ग्रुपच्या माध्यमातून केवळ साखर उत्पादनच नव्हे तर शेतकऱ्यांचे आर्थिक सक्षमीकरण, ग्रामीण अर्थव्यवस्थेचा विकास आणि स्थानिक पातळीवर रोजगारनिर्मिती साधली जात आहे. भविष्यातही ‘शेतकरी हाच केंद्रबिंदू’ ही भूमिका कायम ठेवत ओंकार शुगर ग्रुप शेतकरी हित अन् ग्रामीण विकासासाठी विश्वासार्ह उद्योग समूह म्हणून सातत्याने वाटचाल करीत राहील, असा ठाम विश्वास शेतकऱ्यांकडून व्यक्त होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here