जालना : कर्मयोगी टोपे समर्थ कारखान्यातर्फे १५ मार्चअखेर सर्व उसाचे गाळप करण्याची माजी मंत्री राजेश टोपे यांची ग्वाही

जालना : कर्मयोगी अंकुशराव टोपे समर्थ सहकारी साखर कारखाना युनिट एक व सागर युनिट दोन, उसाचे शंभर टक्के गाळप करणार आहे. दरवर्षी मे महिन्यापर्यंत कारखाना सुरू राहतो. यंदा मात्र १५ मार्चच्या आत म्हणजे महिनाभराच्या आत पूर्ण उसाचे गाळप होवून पट्टा पडेल, अशी परिस्थिती आहे. कारखान्याकडे मोठ्या प्रमाणात तोडणी यंत्रणा असून ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी घाई करू नये व इतरत्र ऊस देवू नये, असे आवाहन माजी मंत्री राजेश टोपे यांनी केले आहे. ‘शेतकरी संवाद’ कार्यक्रमात त्यांनी समर्थ कारखाना यावर्षीही एफआरपीपेक्षा जास्त दर देईल, अशी घोषणा केली.

माजी मंत्री टोपे म्हणाले की, कारखान्याच्यावतीने दररोज १२ हजार टन गाळप होत आहे. ऊस तोडणीवेळी शेतकऱ्यांना त्रास होवू नये, पैसे द्यावे लागू नये यासाठी कठोर निर्णय घेतला असून शेतकऱ्यांसाठी एक तक्रार फॉर्म उपलब्ध करून दिला आहे. शेतकऱ्यांनी कुठेही पैसे देवू नये, पैसे मागितले तर कारखान्यावर तक्रार फॉर्म भरून द्यावा, संबंधितांकडून ते पैसे वसूल करून शेतकऱ्यांना दिले जातील. कारखान्यातर्फे १५ दिवसांत उसाची बिले दिली जात आहेत. वजन काटा पारदर्शक आहे. कारखान्याकडे ३५० ट्रॅक्टर टोळ्या, ३५ ऊसतोड मशिन, एक हजार तीनशे टायरगाड्या, ६५० मिनी ट्रॅक्टर, ४० ट्रक अशी यंत्रणा आहे. शेतकऱ्यांनी घाबरू नये, कारखान्याला सहकार्य करावे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here