जिल्ह्यात 48 हजार 600 हेक्टर ऊस पाण्याखाली

कोल्हापूर : प्रतिनिधी

गेल्या आठ दिवसापासून जिल्ह्यात सुरु असणार्‍या संततधार पावसामुळे जिल्ह्यातील सर्वच नद्यांना पूर आला आहे. पुराचे पाणी विस्तारल्यामुळे जिल्ह्यातील 48 हजार 600 हेक्टरवरील ऊस पिकाखालील क्षेत्र पाण्याखाली गेल्याचा प्राथमिक नजर अंदाज कृषी विभागाने व्यक्त केला आहे. त्यामुळे सोयाबीन, भुईमूग आधी पिकांचेही नुकसान झाले आहे. तसेच, 68 हजार 600 हेक्टरवरील पिकांची हानी झाली आहे.

गेले आठ दिवस पडणार्‍या पावसामुळे जिल्ह्यातील बहुतांशी नद्यांचे पाणी पात्राबाहेर पडले. राधानगरी, काळम्मावाडी, चांदोली, कडवी आदी धरणातून होणारा पाण्याचा मोठ्या प्रमाणातील विसर्ग, संततधार पाउस यामुळे पाण्याची पातळी वाढतच राहिली. त्यामुळे दूधगंगा, वारणा, भोगावती, कुंभी, पंचगंगा, कासारी आदी नद्यांच्या काठावरील ऊस पीक मोठ्या प्रमाणात पाण्याखाली गेले.

जिल्ह्यातील शिरोळ, हातकणंगले करवीर, राधानगरी व गगनबावडा तालुक्याचा काही भाग या परिसरात ऊस पीक पाण्याखाली गेले आहे. पाण्याखाली पिके गेलेले सर्वाधिक क्षेत्र शिरोळ व हातकणंगले तालुक्यातील आहे. त्या खालोखाल करवीर तालुक्यातील पिके पाण्याखाली गेली आहे. काही दिवसांपूर्वी पावसाने उघडीप दिल्यामुळे पिकांची वाढ खुंटण्याची भीती निर्माण झाली होती.

1 लाख 45 हजार हेक्टरवर उसाची लागवड होते. यंदा सुरुवातीला पावसाची संततधार होती. त्यानंतर काही काळ पावसाचा खंड पडला. गेले सहा दिवस पावसाची पुन्हा संततधार सुरू आहे. ऊस पिकाखालील क्षेत्रात पाणी साचून राहिले आहे. सूर्यप्रकाशाचा अभाव असल्यामुळे ऊस पीक गारठण्याची व उसाची वाढ खुंटण्याची शक्यता अधिक आहे. ऊस उत्पादकांना मोठा फटका बसणार आहे.

यंदाच्या खरीप हंगामत 53 हजार हेक्टरवर सोयाबीन, तर 42 हेक्टरवर भुईमुगाची लागवड झाली आहे. पाण्यामुळे काही ठिकाणी ही पिके कुजण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. तसेच इतरत्रही पाण्याचा निचरा न झाल्यास भुईमूग व सोयाबीन पिके वाया जाण्याची शक्यता आहे.

हि बातमी ऐकण्यासाठी इमेज खालील बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here