कोल्हापूर : ‘आंदोलन अंकुश’ संघटनेतर्फे ऊस रिकव्हरी प्रयोगशाळेसाठी निधी संकलन मोहीम

कोल्हापूर: आंदोलन अंकुश संघटनेने लोकवर्गणीतून ऊस वजन काट्याचा यशस्वी प्रयोग केला आहे. त्यानंतर ऊस रिकव्हरी प्रयोगशाळा लोकवर्गणीतून साकारण्याचा संकल्प केला आहे. २६ जानेवारीपासून लोकवर्गणी संकलनाचा प्रारंभ करण्यात आला आहे. ऊस रिकव्हरी प्रयोगशाळेसाठी अंदाजे दहा लाख रुपये खर्च अपेक्षित आहे. ‘आंदोलन अंकुश’वर विश्वास असणाऱ्या अनेक शेतकऱ्यांकडून या उपक्रमासाठी भरभरून मदत केली जात आहे. ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी ही प्रयोगशाळा विनाशुल्क असेल, अशी माहिती ‘आंदोलन अंकुश’चे प्रमुख धनाजी चुडमुंगे यांनी दिली. शेतकऱ्यांना दिली जाणारी ऊसाची कायदेशीर किंमत ही साखर कारखान्याच्या रिकव्हरीवर ठरवली जाते. ती रिकव्हरी कारखाना सांगेल ती शेतकऱ्यांना मान्य करून त्या रिकव्हरीनुसार निघणारी एफआरपी घेऊन गप्प बसावे लागते. यातील फसवणूक टाळण्यासाठी ही प्रयोगशाळा असेल.

चुडमुंगे म्हणाले की, संघटनेच्या माध्यमातून पुढील हंगामापासून ऊस रिकव्हरी प्रयोगशाळा सुरू केली जाईल. यासाठी शेतकरी व दानशुरांकडून वर्गणीचा ओघ सुरू आहे. संघटनेच्या माध्यमातून सातत्याने उसाला योग्य भाव मिळण्यासाठी लढा दिला जात आहे. शेतकऱ्यांची साखर उताऱ्यात फसवणूक केली जाते असे लक्षात आले आहे. ही फसवणूक टाळण्यासाठी ऊस रिकव्हरी प्रयोगशाळेचा संकल्प करण्यात आला आहे. जिल्ह्यातील बहुसंख्य साखर कारखान्यांची त्या-त्या दिवसाची रिकव्हरी पाहिली, तर ती ११.४० टक्केच्या आसपास दिसते. तसेच ब्रिक्स मीटरने आज पुरवठा होणाऱ्या उसाची अर्थाने ढोबळ रिकव्हर काढली, तर ती १२.५० टक्क्यांपुढे दाखवते. या रिकव्हरीत होणारी फसवणूक टाळण्यासाठी आमचे प्रयत्न आहेत. लोकवर्गणी जमवण्यासाठी आठवडाभरात तालुक्यातील प्रत्येक गावात बैठका घेऊन मदतीचे आवाहन केले जाणार असल्याचे चुडमुंगे यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here